शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात उपचार घेत असलेल्या १४ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८६ झाली आहे. दुसरीकडे सोमवारी जनता संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला.

सोमवारी दुपापर्यंत जिल्ह्यात करोनाची रुग्ण संख्या १६२ वर गेली आहे. यात सर्वाधिक १०२ रुग्ण धुळे शहरातील आहेत. यातील १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दर दिवशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.  दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्या रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. त्यानुसार रविवारी एकाच दिवशी १४ जणांनी करोनावर मात केली. सर्वांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून निरोप देण्यात आला. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, आयुक्त अजिज शेख, उपायुक्त गणेश गिरी, वैद्यकीय अधीक्षक तथा करोनाचे प्रमुख अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मलकुमार रौंदळ, डॉ. अरुण मोरे, डॉ. जितेंद्र जैन, अधिसेविका अरुणा भराडे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.

करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील वाडी येथील भावांसह बल्हाणे येथील पती-पत्नीचा समावेश आहे.

याशिवाय जिल्हा कारागृहातील तीन, चक्करबर्डी परिसरातील तीन जणांसह शहरातील इतर भागातील चौघांचा समावेश आहे. त्यापैकी कारागृहातील तिघे २० मेपासून तर उर्वरित ११ रुग्ण २२ मेपासून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. आठ दिवसांत जिल्हा रुग्णालय आणि हिरे महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या २३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा अटकाव करण्यासाठी सोमवारी धुळ्यात एक दिवसाची जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने बंद असतांनाही रस्त्यांवरील वर्दळ कायम राहिली. शहरातील करोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांना करोनाचे गांभिर्य कळावे आणि लोकांनी शिस्तीचे पालन करावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सोमवारी एक दिवसाची जनता संचारबंदी जाहीर केली.

त्यानुसार शहरातील आग्रारोड, पारोळारोड, चैनी रोड, जेबी रोड, एसटी स्थानक, फाशीपुल, चितोड रोड, साक्रीरोड, देवपूर, वलवाडी, नगावबारी अशा सर्वच भागातील सर्व दुकाने, भाजीपाला, दूध असे सर्व काही बंद ठेवण्यात आले. शहरात सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आल्या असल्याने बहुतांश लोकांनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.