रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत करोनाच्या सर्वाधिक, सुमारे आठशे चाचण्या होऊनही त्यापैकी फक्त १८ जणांचे अहवाल होकारात्मक  आले आहेत. तसेच एकाही रूग्णाचा मृत्यू ओढवलेला नाही.

याचबरोबर, एका दिवसात ४३ जणांनी करोनावर मात केली असून रूग्ण  बरे होण्याचे प्रमाण ९०.६१ टक्के आहे. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, करोनाबाधित रूग्णांच्या प्रमाणामध्ये आघाडीवर असलेल्या रत्नागिरी तालुक्यात गेल्या तीन महिन्यात प्रथमच २४ तासात एकही रुग्ण सापडलेला नाही.

जिल्ह्यात विक्रमी संख्येने चाचण्या होऊनही हे चित्र असल्याने करोनाचा संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश आले असल्याचे मानले जात आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील करोनामुळे मृतांची संख्या ३०२ वर पोचली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आढळून आलेल्या नवीन करोनाबाधितांपैकी चिपळूण तालुक्यातील ९, मंडणगड तालुक्यातील ८, तर दापोली तालुक्यातील फक्त १ रुग्णाचा समावेश आहे.  खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या इतर ६ तालुक्यांमध्ये या दोन दिवसांत एकही क रोना रुग्ण सापडलेला नाही.

सिंधुदुर्गात ३ ८६१ करोनामुक्त

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण ३ हजार ८६१ करोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आणखी २७ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात रविवारी  ५८ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५४७ तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११७ एवढी झाली आहे.