शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय ३०) आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२८ एप्रिल) सांयकाळी सव्वा सहाच्या दरम्यान बीड रस्त्यावरील वामन ट्रेडर्ससमोर घडली. नगरमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, योगेश व राकेश राळेभात हे वामन ट्रेडर्ससमोर बोलत होते. त्याचदरम्यान सांयकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या आणि तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे योगेश व राकेश उपचाराअभावी अर्धा तास तसेच पडून होते. वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात जमाव उपस्थित होता. ते जोरदार घोषणाबाजी करत होते. नागरिकांचा संताप पाहून राम शिंदे यांनी तेथून काढता पाय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे.