राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात २०१ नवीन रूग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी वाढ आहे. याचबरोबर आतापर्यंत सापडलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३ हजार २७७ पोहचली आहे. तर, आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू  देखील झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेलीची एकूण संख्या १२५ झाली आहे. एकूण २ हजार २२ जणांना करोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार १३० आहे.

आज सापडलेल्या रूग्णांमध्ये  पनवेल शहर-८८ , पनवेल ग्रामीण- ३१ , उरण-१५ , खालापूर -७, रोहा-१५, कर्जत-२,  पेण -४, अलिबाग-८, मुरुड-१ , श्रीवर्धन-१, माणगाव-८ , पोलादपूर-१ येथील रुग्णांचा  समावेश आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५ हजार ३१८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात जे १६७ मृत्यू गेल्या चोवीस तासात नोंदवले गेले त्यातले ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू मागील कालावधीतले आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के इतका आहे. मागील २४ तासात ४४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत ८४ हजार २४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ५२.९४ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत पाटवण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह आले.