लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  शहरात करोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शहरातील आणखी दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्या दोन रुग्णांचा १९ मे रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३ जणांचे मृत्यू झाले आहेत. शहरात शुक्रवारी १४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या साडेतीनशे पार जाऊन ३५५ वर पोहोचली. सध्या १२६ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाचा प्रकोप कायम असून, रुग्ण संख्या वाढीसह मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी आणखी दोन मृत्यू आणि १४ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १५८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १४४ अहवाल नकारात्मक, तर १४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३५५ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २०६ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १२६ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, १९ मे रोजी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून, ती नायगाव येथील रहिवासी होती, तर दुसरा मृत रुग्ण ५२ वर्षीय पुरुष असून, बाळापूर मार्ग अकोला येथील रहिवासी होता. आज दिवसभरात १४ रुग्ण वाढले. सकाळच्या अहवालानुसार सकारात्मक आलेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये दोन मृतांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांमध्ये दोन फिरदोस कॉलनी, तर आंबेडकर नगर, गोकूळ कॉलनी, मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर व बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यामध्ये एक महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण जुने शहर, अकोट फैल, गोकूळ कॉलनी, मलकापूर अकोला, हमजा प्लॉट, पातूर तालुक्यातील मुजावरपूरा येथील रहिवासी आहेत. अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये करोनाचा संसर्ग पसरत आहे. जिल्ह्यात रुग्ण व मृत्यू संख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वर्ध्यातील करोनाबाधिताच्या संपर्कात आली ती महिला
जिल्ह्याच्या बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील एका महिला रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. ही महिला रुग्ण मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. गावात आल्यापासून ही महिला जि.प.शाळेतील विलगीकरण कक्षातच होती.

१५ जणांना रुग्णालयातून सुटी
आतापर्यंत जिल्ह्यातील २०६ जण करोनातून बरे झाले आहेत. गुरुवारी रात्री १५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील १० जण कोविड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत, तर पाच जणांना घरी सोडण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातील ते रहिवासी आहेत.

…तर काही दिवसांत नागपूरच्याही पुढे
विदर्भात करोनाचे सर्वाधिक ४०० पेक्षा अधिक रुग्ण नागपूरमध्ये आढळून आले आहेत. त्या खालोखाल आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ३५५ रुग्ण आढळून आले. रुग्ण वाढीचा असाच वेग कायम राहिल्यास काही दिवसांमध्येच करोनाबाधितांच्या संख्येत अकोला नागपूरच्याही पुढे जाण्याची चिन्हे आहेत.