पालघर जिल्ह्यातील २३ शाळांमध्ये वर्ग सुरू होणार

निखील मेस्त्री, पालघर

पालघर जिल्ह्यात आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नववी इयत्तेत प्रवेश मिळविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हे विद्यार्थी यंदाही नववीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षणमंत्र्यांकडे नववीचे वर्ग सुरू करण्यासाठी साकडे घातले. २३ शाळांना नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता मिळणार असल्याने जिल्ह्यातील नववीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या सुटणार आहे.

या आधीच गतवर्षी नव्याने नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शाळांना मंजुरी देण्यात आली होती त्यामध्ये ३९ शाळांनी नव्याने वर्ग सुरू केले.त्यामुळे नववी प्रवेशाची समस्या त्यावेळी सोडवली गेली. मात्र त्यावेळी या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे बऱ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि अभ्यासाचे नुकसानही झाले होते. मात्र आता ही बाब लक्षात घेत आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदींनी शाळा सुरू होण्याआधीच जिल्ह्यातील तालुक्यांतील शाळांकडून  तसा प्रस्ताव तयार केला. शिक्षणमंत्र्यांकडे यासाठीचा प्रस्ताव या शिष्टमंडळामार्फत काही दिवसांपूर्वी देण्यात आला. शिक्षण मंत्र्यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

विविध तालुक्यांमधील शाळांमध्ये २३ नवे सुरु नवे वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव मंत्रालयात शिक्षण विभागाकडे दिला आहे. त्या अनुषंगाने या शाळांना मान्यता मिळणार असल्यामुळे आधी असलेल्या वर्गापेक्षा अतिरिक्त झालेल्या विद्यर्थ्यांंना या शाळांमध्ये सामावून घेता येणार असल्याचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी सर्वसामान्य सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी नववीच्या प्रवेशाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्यामुळे नववीच्या प्रवेशाची ही समस्या सुटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती निलेश गंधे यांनी म्हटले आहे.

१४ हजार विद्यार्थी

जिल्ह्यात नववीच्या प्रवेशाची समस्या दोन वर्षांपासून भेडसावत आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात काही ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी झाल्यानंतर गतवर्षी जिल्हा परिषदेचे शिष्टमंडळ आणि पालघर जिल्ह्यातील आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने नववी व दहावीचे वर्ग सुरू करावे अशी मागणी शिक्षणमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. पालघर जिल्हा परिषदेत ६० नवीन वर्ग सुरू करण्यासाठी ३१ जुलै २०१८ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. गतवर्षी ६० नवीन वर्गाना मान्यता मिळाल्यानंतर त्यातील ३९ वर्ग सुरू करण्यात आले होते. या वर्गाना लागणारा शिक्षक वर्ग हा जिल्हा परिषदेतील शेष फंडातून देण्यात आला होता. गतवर्षी हे नवीन वर्ग स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १४  हजार विद्यार्थी सामावून घेण्यात आले.