जालना जिल्ह्य़ातील २५ एकर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे

औरंगाबाद : परतूर तालुक्यातील रायगव्हाण या गावातील मुरलीधर गणपत केकान या शेतकऱ्याची जमीन सावकारांनी हडप केली. गहाणखत करून दिलेली जमीन व्याजाची रक्कम देऊनही सावकार परत करत नव्हता. मग, मुरलीधर केकान यांचा मुलगा सिद्धेश्वर याने एकेक कागद जमा करायला सुरुवात केली. केवळ जालना जिल्ह्य़ातील नाही तर परभणी जिल्ह्य़ातील गहाण ठेवलेल्या जमिनींची कागदपत्रे गोळा केली. शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आणि एक लढा चालू ठेवला. अखेर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी नव्या सावकारी कायद्याच्या अधिनियमानुसार २५ एकर जमीन शेतकऱ्यांना परत केली आहे. बळीराम अश्रोबा कडपे असे सावकाराचे नाव असून त्याने तब्बल ६०० एकर जमीन बळकावल्याची तक्रार मुरलीधर केकान यांनी केली होती.

परतूर तालुक्यातील आष्टी या गावची गट क्र.५०१ मधील एक हेक्टर ८५ आर जमिनीचे गहाणखत करून देण्यात आले होते. व्याज देऊनही रक्कम परत न केल्यामुळे वैतागलेल्या केकान यांनी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे सावकार बळीराम कडपे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेव्हा ५० शेतकऱ्यांची १५० एकरांची कागदपत्रे सावकाराच्या घरी आढळून आली. एका बाजूला ही कायदेशीर लढाई सुरू असताना सावकार कडपे याने कायद्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्या तारखा सुरू आहेत. पण सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केकान यांच्या तक्रारीवर गांभीर्याने विचार केला आणि तेही कारवाई करत राहिले. केकान यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल म्हणून भोवतालच्या शेतकऱ्यांनीही मग त्यांना साथ देणे सुरू केले. महादेव परबता कोटे, प्रयाग पोटे, सौमित्राबाई घुले, कौसाबाई बडे, मुक्ताबाई आघाव या शेतकऱ्यांनी एकेक वैध कागद सहकार विभागाला द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या बाजूने निर्णयही व्हायला लागले.

सातबाऱ्याला नाव लागण्याची प्रक्रिया करण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. आता तक्रार करणाऱ्या काही जणांना जमिनी परत मिळाल्या आहेत. आणि अजूनही १४ प्रकरणे सहकार विभागात प्रलंबित आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मराठवाडय़ात सुरू असणारी सावकारी केकान यांच्या उदाहरणामुळे पुढे आली. पण स्वत:ची शेती पदरात पाडून घेण्यासाठी रायगव्हाण व भोवतालच्या शेतकऱ्यांना एक मोठा संघर्ष करावा लागला. सावकाराने कधी धमक्या दिल्या, तर कधी न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मराठवाडय़ात सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी अशा सावकाराकडे अडकलेल्या जमिनी सोडवून घेण्यासाठीच्या शेतकऱ्याच्या प्रयत्नांना साथ दिल्यामुळे सावकारी पाश काहीसा सैल झाल्याचे वातावरण आहे.