महाराष्ट्रात करोनाचे २५६० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १२२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांमधली ही संख्या आहे. मागील २४ तासांमध्ये ९९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७४ हजार ८६० इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन २५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला ३९ हजार ९३५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत ३२ हजार ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातले करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ४३.१८ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाइन तर ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मागील चोवीस तासांमध्ये ज्या मृत्यूंची नोंद झाली त्यामध्ये ७१ पुरुष तर ५१ महिला होत्या. १२२ रुग्णांचे जे मृत्यू नोंदवले गेले त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरच्या वयाचे ६९ रुग्ण होते. तर ४६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ७ रुग्ण हे ४० वर्षांखाली होते. १२२ पैकी ८८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे गंभीर आजार आढळले. आत्तापर्यंत ४ लाख ९७ हजार २७६ नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. ज्यापैकी ७४ हजार ८६० जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. उर्वरित रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.