संशयित तीन विद्यार्थी निलंबित

जळगाव : शहरातील इकरा युनानी महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या २८ विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री विवस्त्र करून सामूहिक रॅगिंग केले. या प्रकरणी संशयित तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका विद्यार्थ्यांने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिल्याने  हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतिगृहात दाखल झाल्यानंतर पहिल्या रात्री सर्व विद्यार्थी  वसतिगृहात झोपलेले असतांना १५ ते २० वरिष्ठ विद्यार्थ्यांंनी पहाटे दोन वाजता नवीन २८ विद्यार्थ्यांंना एका वर्गात नेऊन विवस्त्र केले. त्यानंतर अभिनय करण्यास सांगून सर्व विद्यार्थ्यांंची ओळख परेड घेतली. या प्रकारास या विद्यार्थ्यांने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली. त्याच्या खिशातील भ्रमणध्वनी काढून कचरा पेटीत फेकला. १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन टय़ुबलाईट विझविण्यास सांगण्याचा प्रकरा झाला. टय़ुबलाईट न विझल्यास ती अंगावर फोडण्यात येईल, असे धमकाविण्यात आले. हा त्रास असह्य़ झाल्याने त्याने पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पालकांना दूरध्वनी करुन सर्व माहिती दिली.

पालकांनी त्वरीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्याकडे तक्रार केल्यावर प्राचार्यानी घटनेची चौकशी करीत तीन विद्याथ्यार्ंना तडकाफडकी निलंबित केले. या  विद्यार्थ्यांने पहाटे दिल्ली येथील रॅगिंग प्रतिबंधक समितीकडे मेलद्वारे तक्रार केली. प्राचार्य डॉ. शेख यांनी सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.