राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्येही करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे अगोदरच रेड झोनमध्ये समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या 1360 झाली असल्याची जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. आज आढळलेल्या 30 रुग्णांमध्ये 9 महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे.

तर, देशात मागील 24 तासत 6387 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 767 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 4337 इतकी झाली आहे. सध्या देशात करोनाचे 83 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान 64 हजार 425 जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.