राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील एका ६५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ४२ झाली आहे.

दरम्यान, करोनावर मात केलेल्या १९ रुग्णांना मंगळवारी घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६८ झाली आहे.

जिल्ह्यात काल रात्री ३७ नवीन पॉझिटिव्ह रग्ण आढळले होते, तर मंगळवारी दिवसभरात नवीन १० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गेल्या २४ तासांत एकूण ४७ करोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. त्यापैकी रत्नागिरी जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील २१, तर कामथे उपजिल्हा रुग्णालयातील २४ रूग्ण आहेत. गेल्या एप्रिल महिन्यापासूनच्या करोनाबाधित रूग्णांची संख्या १ हजार ३०९ झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४९९ आहे, तर मंगळवारी बरे होऊन घरी गेलेल्या १९ रुग्णांपैकी१५ दापोलीच्या कोकण कृषी विद्यपीठ केंद्रातील आहेत.

रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या रुग्णांमुळे आज सन्मित्रनगर रत्नागिरी, लक्ष्मी आर्केड, साळवी स्टॉप, रत्नागिरी, जयगड—रत्नागिरी, कोतवडे घामेलेवाडी—रत्नागिरी, गावडे आंबेरे—रत्नागिरी, झरेवाडी, हातखंबा—रत्नागिरी, कर्ला मुसलमानवाडी, राजिवडा—रत्नागिरी हे क्षेत्र करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत, तर प्रतिबंधित क्षेत्रे१०५ आहेत.

संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये  एकूण १०९ संशयित करोना रुग्ण दाखल असून गृह विलगीकरणाखाली असलेल्यांची संख्या १५  हजार ५१० आहे.