निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे.

“मुंबई-ठाण्याचा काही भाग चक्रीवादळाच्या पट्ट्यात असून पुढील एका तासात मुंबईकडे धडकण्याची शक्यता आहे. वादळ दिशा बदलण्याची शक्यता कमी असून जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा तशी वेग १०० ते ११० किमी असण्याची चिन्हे असल्याची,” माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

“वादळाची लँडफॉल हेण्यास सुरुवात झाली असून ही संपूर्ण प्रक्रिया तीन तासांची असेल. रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे वादळ सरकत जाईल. सध्या अलिबागमध्ये जोर असून १२५ किमी प्रतितास वारे वाहत असल्याचंही,” त्यांनी सांगितलं आहे.