११ वर्षांत ५० हजार विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
लातूर : चाळीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याचे अनेक उच्चपदस्थ मंडळी अभिमानाने सांगत असत. काळ बदलला. खासगी शाळांचे पेव फुटले. आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा खेडोपाडय़ापर्यंत पोहोचल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा तग धरत नसल्यामुळे दरवर्षी विद्यार्थी संख्येत घट होत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळात टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जिल्हय़ातील दहाही तालुक्यात निर्धार सभा घेण्याचे ठरवले असून त्यापैकी चार तालुक्यांत या सभा झाल्या. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अतिशय चांगले उपक्रम राबवले जातात व राज्यातच नव्हे तर देशपातळीवर ज्यांच्या उपक्रमाची दखल घेतली जाते अशा मंडळींना सोबत घेऊन शाळेची पटसंख्या वाढवणे व गुणवत्ता वाढवणे हे आव्हान पेलण्यासाठी पालक व शिक्षकांची मानसिकता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
२००७-०८ साली जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७० हजार २९८ होती. १७-१८ मध्ये ती ५० हजाराने घसरली
१९९४ साली जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची संख्या ९८००च्या दरम्यान होती. २०१८ मध्ये केवळ ५९११ शिक्षक आहेत. लातूर जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या १२८४ शाळा आहेत. खासगी अनुदानित शाळांची संख्या ९१३ असून विनाअनुदानित शाळांची संख्या ३८० आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी संख्या नेमकी का घटते आहे? याच्या कारणांचा शोध घेतला असता पूर्वी पहिली ते चौथीपर्यंत पूर्वप्राथमिक, पाचवी ते सातवी प्राथमिक व आठवी ते दहावी माध्यमिक शाळा असत. त्यानंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडला व आठवी ते दहावीच्या शाळांना सहावीपासूनचे वर्ग जोडले. काही ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडला. अशा सर्व ठिकाणी वर्ग जोडताना अतिरिक्त शिक्षक दिलाच नाही. त्यामुळे पालकांचा या शाळांवरील विश्वास कमी झाला.
इंग्रजी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी खासगी शाळांनी सेमी इंग्लिश सुरू केले मात्र याचाच वापर जिल्हा परिषद शाळेने केला नाही. जिल्हा परिषदेची ही अवस्था अशीच राहिली तर शाळा बंद व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात घेऊन रामचंद्र तिरुके यांनी तालुका स्तरावर निर्धार मेळावे घेणे सुरू केले आहे.
दोन वर्षांत एकही सुटी नाही
या मेळाव्यात औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भारत सातपुते यांचा सहभाग आहे. ज्यांनी गेल्या २७ महिन्यापासून सुट्टी न घेता शाळा चालवण्याचा उपक्रम राबवला असून कदाचित देशात अशी शाळाच नसेल. लातूर तालुक्यातील मुरुड येथील पारुनगर शाळेच्या मुख्याध्यापिका श्यामला जोशी यांचाही सहभाग आहे. २००३-०४ साली या शाळेत केवळ २४ विद्यार्थी संख्या होती. आज या शाळेची विद्यार्थी संख्या ११०० आहे. ही जिल्हय़ातील जिल्हा परिषदेची पहिली सेमी इंग्लिश शाळा आहे.
नळेगाव येथील प्रमोद हुडगे, गुंजरगा येथील संजय कदम व तांबाळा येथील दयानंद मठपती हे उपक्रमशील शिक्षक मेळाव्यात सहभागी होतात. आपल्या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी नेमके काय केले हे मेळाव्यात सांगितले जाते. सध्या ५९०० शिक्षकांपैकी केवळ ४०० शिक्षकांचे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. उर्वरीत विद्यार्थी खासगी व इंग्रजी शाळांमध्ये शिकतात. शिक्षकांचेच विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नसतील तर अन्य पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवावे असे हे शिक्षक कोणत्या तोंडून सांगणार, असा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी नोकरीच्या गावी मुक्कामी असले पाहिजे असे शासन परिपत्रक आहे. एक टक्का शिक्षकही नोकरीच्या गावी राहात नाहीत. आपली नोकरी पक्की आहे. आपल्याला नोकरीवरून कोणीही काढू शकत नाही याचा विश्वास असल्यामुळे शिक्षक मंडळी मूळ शिक्षणाकडेच दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांनी शिक्षणाचा ध्यास घेण्याची गरज : सातपुते
पंतप्रधानांनी योग दिवस केवळ वर्षांतून साजरा न करता तो रोज केला पाहिजे असे आवाहन केले होते त्यातूनच रोज विद्यार्थ्यांचा व्यायाम व्हावा यासाठी प्रारंभी योग सुरू केला. त्यानंतर विविध उपक्रम राबवणे सुरू केले अन् गेले २७ महिने सुट्टीविना शाळा चालवण्याचा विक्रम नोंदवला. या उपक्रमानंतर परिसरातील इंग्रजी शाळांतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. दरवर्षी पटसंख्या वाढते आहे. व्यायामामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारत असून त्यांचा शाळेतील रस वाढला आहे. गावकऱ्यांना शाळेबद्दल अभिमान वाटतो आहे. ही आपुलकीची भावना निर्माण करण्यातून शिक्षणाचे सर्व प्रकारचे हेतू साध्य होतील असे मत भादा येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी व्यक्त केले.
केवळ चार शाळा प्रगत
जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के प्रगत असलेल्या केवळ चार शाळा आहेत. यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी व नागेवाडी, उदगीर तालुक्यातील नरसिंगवाडी व रेणापूर तालुक्यातील सेवालालनगर तांडा या शाळांचा समावेश आहे. अध्ययन स्तर स्थितीत राज्यात सोलापूर जिल्हय़ाचा पहिला क्रमांक असून लातूर जिल्हा परिषदेचा खालून पाचवा क्रमांक आहे.