सांगली-मिरज मार्गाचे सहापदरीकरण करण्याची बांधकाम विभागाला घाई झाली असून यासाठी या मार्गाचे प्रदूषण रोखणारे शतकाहून अधिक वर्षांची ८४ झाडांची तोड होण्याचा धोका आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर करण्यापूर्वी ११ कोटींचा निधी खर्च करण्याचा अट्टाहास बांधकाम विभागाचा सुरू असून यासाठी सर्वच बाबतीमध्ये घिसाडघाई करण्यात येत असून याच्या दर्जाबाबत तडजोड केली जात नसल्याचा कितीही आव आणला जात असला तरी त्रयस्थ चौकशी झाली तर प्रशासकीय मान्यतेपासूनच घाई झाल्याचे दिसून येईल.

सांगलीच्या विश्रामबाग चौक ते भारती हॉस्पिटल या मार्गाचे चौपदीकरण झाले असताना या मार्गाचे सहापदरीकरण करण्यात येत आहे. यासाठी रस्त्याच्याकडेला असलेले शतकाहून अधिक वयाचे वड, िपपळासारखी पर्यावरण पूरक झाडे जमीनदोस्त करण्याचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव आहे. यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मागण्यात आली आहे.

मात्र, बांधकाम विभागाला या रस्तापूर्तीची एवढी घाई झाली आहे की, प्राधिकरण समितीची बठक होण्यापूर्वीच परवानगी मिळणारच हे गृहित धरून झाडांच्या बुंध्याभोवती जेसीबीने उकरण्यात आले आहे. हरित न्यायालयाच्या आदेशाने विकासासाठी तोडण्यात येणाऱ्या प्रत्येक झाडाजवळ हे झाड तोडण्यात येत असल्याची नोटीस लावण्याची आणि नागरिकांच्या हरकती मागविण्याचा कायदा आहे. मात्र विभागाने एका ठिकाणी फलक लावून ही झाडे तोडण्यात येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून देत असताना हरकत कोणाकडे नोंदवायची याचा उल्लेख टाळला आहे.

यापूर्वी या मार्गाचे रूंदीकरण करीत असताना पुष्पराज चौक ते विश्रामबाग या टप्प्यातील ४१, वॉन्लेस हॉस्पिटल ते भारती हॉस्पिटल या टप्प्यातील ७८ झाडे काढण्यात आली. तसेच कॉलेज कॉर्नर ते माधवनगर मार्गावरील ७४ झाडे काढण्यात आली. यापकी बहुसंख्य झाडे ही वडाची दीर्घायुषी होती. वृक्ष प्राधिकरणाने ही झाडे विस्थापित करीत असताना एकास पाच या प्रमाणात सहा फूट उंचीची आणि दोन इंच व्यासाची ज्या जातीची झाडे काढण्यात आली त्याच जातीची लावण्याची परवानगी देत असताना सांगितले आहे. यापकी पुष्पराज चौक ते विश्रामबाग मार्गावर ४१ झाडांच्या बदल्यात २०५ झाडे लावली आहेत, मात्र त्याच्या संगोपनाची कोणतीही जबाबदारी संबंधित ठेकेदार पार पाडत असल्याचे दिसत नाही. योग्य संगोपन नसल्याने यापकी काही झाडांचा अकाली मृत्यू झाला आहे.

आता पुन्हा ८४ झाडांची कत्तल करून या मार्गावरील हिरवाई नष्ट करण्याचा डाव रचला जात आहे. मात्र यासाठी योग्य नियोजन दिसत नाही. अथवा वृक्ष प्राधिकरणाने केलेला सव्र्हे समिती सदस्यांना विश्वासात घेऊन केला नसल्याचा आरोप होत आहे. रोज हजारो टन ऑक्सिजनचा पुरवठा करणारी आणि कार्बन वायू शोषण करून पर्यावरण रक्षणास हातभार लावणाऱ्या या झाडांची कत्तल नजीकच्या काळात पाहण्यास मिळणार आहे. याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, विकासकामे करीत असताना झाडे काढावीच लागणार आहेत. मात्र या बदल्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन राखण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. या अगोदर लावण्यात आलेल्या झाडांची योग्य देखभाल करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी वृक्षतोडीसाठी बांधकाम विभागाने दिलेली कारणमीमांसा योग्य नसून ती कायदेशीर नसल्याने शहर सुधार समितीने लेखी आक्षेप बुधवारी कार्यकारी अभियंता आणि महापालिका आयुक्तांकडे नोंदविला असल्याचे कार्याध्यक्ष अॅड. अमित िशदे यांनी सांगितले.