औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत ६१.९३ टक्के मतदान झाले. एकूण १५ लाख ८३६ मतदारांपैकी ९ लाख ८२ हजार ७३५ मतदानांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात २७ उमेदवार असले, तरी प्रामुख्याने तिरंगी लढतीत कोणी किती मते खेचली, कोणाची हवा राहणार, कोणाची दांडी जाणार ही चर्चा मतदारसंघात आता रंगली आहे.
विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक मतदान औरंगाबाद पश्चिममध्ये १ लाख ७० हजार ५७१ (पुरूष ९५ हजार २०२, महिला ७५ हजार ३६९, ६४.०१ टक्के), तर वैजापूरमध्ये सर्वात कमी मतदान १ लाख ५७ हजार ३१५ (पुरूष ९० हजार २५९, महिला ६७ हजार ०५६, ५९.२१ टक्के) झाले. अन्य विधानसभा क्षेत्रांत झालेले मतदान व टक्केवारी अशी : कन्नड १ लाख ७२ हजार ५८७ (पुरूष ९७ हजार ६०५, महिला ७४ हजार ९८२,  ६३.०३), औरंगाबाद मध्य १ लाख ६४ हजार ६७७ (पुरूष ९१ हजार १७७, महिला ७३ हजार ५००, ६१.५१), औरंगाबाद पूर्व १ लाख ५६ हजार ४०६ (८७ हजार ५९४, महिला ६८ हजार ८१२, ६३.३६) व गंगापूर १ लाख ६१ हजार १७९ (पुरूष ९२ हजार ७५६, महिला ६८ हजार ४२३, ६०.५३).
दरम्यान, झालेल्या मतदानात कोणत्या पक्षाची किती मते, याची चर्चा गणिते मांडत कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. १६ मे रोजी निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असले, तरी तोपर्यंत ही चर्चा चालूच राहणार आहे. प्रत्यक्ष मतदान संपले आणि निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रमुख पक्षांची प्रचार मोहीम, आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी, नेत्यांचे दौरे, प्रमुख नेत्यांच्या सभा, भेटीगाठी, चौकसभा वगैरे माहोल एकदम थंडावला. गेले काही दिवस उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असून, भाजून काढणाऱ्या उन्हातही प्रचाराची हवा चांगलीच गरम झाली होती. असह्य़ उष्म्याला तोंड देताना कार्यकर्ते हैराण झाले होते. मध्यंतरी पावसानेही हलकासा शिडकावा केला. मात्र, आता आकाशही निरभ्र झाले असून उन्हाची काहिली चांगलीच असह्य़ झाली आहे. मतदान पार पडल्याने गेले काही आठवडे उठलेला राजकीय धुरळाही शांत झाला आहे. त्यामुळे मतदानानंतर पहिल्याच दिवशी राजकीय आघाडीवर कमालीची शांतता होती. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, नेतेगण सुटलो एकदाचे म्हणत गायब झाले आहेत. सर्वानाच वेध आता १६ मेचे आहेत. तोपर्यंत राजकीय मैदानात शांतता राहील.