उन्हाच्या तडाख्याला न जुमानता उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला.

सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६८, तर धुळ्यात ५७ टक्के कमी मतदानाची नोंद झाली.  दिंडोरीमध्ये ६४, तर नाशिकमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत काही ठिकाणी टक्केवारीत वाढ झाली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उमेदवार असलेल्या धुळे मतदारसंघात घटलेल्या मतदानाचा लाभ कोणाला होणार, याचे तर्कवितर्क लढविले जात आहे. दुसरीकडे नाशिकचे हेमंत गोडसे, नंदुरबारच्या डॉ. हिना गावित या विद्यमान खासदारांसह नेत्यांचे भवितव्य बंद झाले.

शेवटच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील चार मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी चाचणी मतदानावेळी काही यंत्रात बिघाड होण्याचे प्रकार घडले. तिथे तातडीने मतदान यंत्र कार्यान्वित केल्याने मतदान प्रक्रियेत अडसर आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र रणरणत्या उन्हात भाजून निघाला आहे. आदल्या दिवशी पारा जवळपास ४३ अंशावर पोहचल्याने मतदानावर परिणाम होण्याची वाटणारी धास्ती प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी फोल ठरली. उन्हाची पर्वा न करता शहरी, ग्रामीण भागातील मतदार मतदानासाठी बाहेर पडले. अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होल्या.

नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, बहुजन विकास आघाडीचे पवन पवार आणि भाजप बंडखोर माणिक कोकाटे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. गेल्यावेळी नाशिकमध्ये ५९ तर दिंडोरीत ६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी दोन्ही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, अपक्ष अनिल गोटे आणि महाआघाडीचे आ. कुणाल पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात ५७ टक्के मतदान झाले. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६८ टक्क्य़ाहून अधिक मतदान होण्याचा अंदाज आहे. महायुतीच्या डॉ. हिना गावित आणि महाआघाडीचे आ. के. सी. पाडवी यांच्यात लढत होत आहे.

यंत्रावर मतदान करतानाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या वाडीवऱ्हे येथील संशयित नितीन कातोरीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदानावेळी भ्रमणध्वनीचा वापर करू नये असे आवाहन पोलिसांनी आधीच केले होते. या मतदाराने त्याकडे दुर्लक्ष करत मतदान कोणाला केले याचे छायाचित्र टिपले. नंतर ते समाजमाध्यमात टाकले. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील १३७ क्रमांकाच्या केंद्रात हा प्रकार घडला. असाच प्रकार कळवण येथील एका केंद्रावर घडला. एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचे छायाचित्र समाजमाध्यमात पसरले. परंतु, त्याबाबत तक्रार आली नसल्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.