उस्मानाबाद : आयुष्यभर नोकरी करून कमविलेला पसा भविष्यात कामाला येईल म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदत ठेव ठेवली. बँकेची परिस्थिती नसल्याने बँक प्रशासनाने वेगवेगळ्या टप्प्यात मुदत ठेवीची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. मात्र, प्रत्यक्षात ६५ वर्षीय खातेदाराला हक्काचे पैसे मिळत नसल्याने मानसिक तणाव वाढला. बँकेत कोणीही नीट बोलायला तयार नाही. यामुळे हृदयविकाराचा धक्का बसून बँकेतच खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. गुलाबराव वीरभद्र पारशेट्टी असे मृत व्यक्तीचे नाव असून नातेवाइकांनी हक्काचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी पारशेट्टी यांचा मृतदेह बँकेच्या मुख्य शाखेसमोर ठेवून टाहो फोडला. या वेळी बँकेच्या प्रशासनाला उपस्थित संतप्त समुदायाने चांगलेच फैलावर घेतले होते.

शहरातील गणेशनगर भागात राहणारे गुलाबराव वीरभद्र पारशेट्टी हे एस. टी. महामंडळामध्ये चालक या पदावरून निवृत्त झाले होते. त्या वेळी त्यांनी आपली सगळी जमापुंजी जिल्हा बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवली होती. ही रक्कम जवळपास १५ लाखांच्या घरात होती. पण जेव्हा ही रक्कम काढायची वेळ आली, तेव्हा मात्र त्यांना ती काही हजारांमध्ये मिळत होती. यामुळे ते मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कालसुद्धा (बुधवारी) ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना बँकेच्या एकाही अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. सतत चिडचिड वाढली होतीच, त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातून नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह थेट जिल्हा बँकेच्या दारात आणला. यामुळे प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आलेल्या जनसमुदायाला शांत करण्यासाठी प्रशासनाने ही रक्कम परत देण्याचे लेखी आश्वासन दिले.

लेखी आश्वासनामध्ये त्यांनी सांगितले, की तीन टप्प्यामध्ये उर्वरित पाच लाख ५८ हजार रुपयांची रक्कम दिली जाईल. तसेच या अगोदर नऊ लाख ३७ हजार रुपये खातेदाराला दिलेले असल्याची माहिती त्यामध्ये दिली आहे.