राज्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सध्या सुरू असलेला लॉकडाउन आता राज्य सरकारकडून १५ मे पर्यंत वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज मोठ्या संख्यने करोनाबाधित वाढत असल्याचे दिसून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मात्र असे जरी असले तरी करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्याची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात आज ६८ हजार ५३७ रूग्ण करोनातून बरे झाले तर, ६६ हजार १५९ नवीन करोनाबाधित आढळले. याशिवाय ७७१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ३७,९९,२६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.६९ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६८,१६,०७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४५,३९,५५३ (१६.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,१९,७५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Lockdown in Maharashtra : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना यासंदर्भातले संकेत दिले होते. राज्यात १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे.