वणी येथे ६६व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर झाल्यास समाजच त्यावर अंकुश ठेवतो व तो सरकार आणि  कायद्यापेक्षा मोठा असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वणी येथे आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुप्रसिध्द दिग्दर्शक राजदत्त, स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, मुख्य संयोजक माधव सरपटवार, कार्याध्यक्ष वामन तेलंग, शाखाध्यक्ष दिलीप अलोणे, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक शुभदा फडणवीस आदी उपस्थित होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे आणि ते आहे सुद्धा, मात्र त्याचा गैरवापर झाल्यास समाजच त्यावर अंकुश ठेवतो, असे स्पष्ट करताना फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरवापर करणाऱ्यांना इशारा दिला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  भूषविलेले लोकनायक बापूजी अणे, राम शेवाळकर आणि वसंत आबाजी डहाके यांची वणी शहर ही भूमी आहे. विदर्भात झाडीपट्टी, नाटय़ महोत्सव, दंडार यासह वेगवेगळ्या नाटय़संस्कृती पाहायला मिळतात. कविवर्य सुरेश भट, ग्रेस यांनी मराठी मनाला वेड लावले. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी समाजमाध्यमांमुळे मुलभूत साहित्य, समाजाला आकार देणाऱ्या साहित्याचे काय होणार, याचा विचार मनात येतो, असे फडणवीस म्हणाले.

समाज घडवण्यात लेखकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे यांनी केले. यावेळी हंसराज अहीर, संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भाषणे झाली. ‘बहुगुणी वणी’ या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी झाले. प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी केले. संचालन प्रा. अभिजित अणे यांनी तर आभार गजानन कासावार यांनी मानले.

‘माझा घसा बसला आहे’

‘माझा घसा बसला आहे, त्यामुळे मी फार बोलणार नाही, अनेकांना याचा आनंद होईल, पत्रकारांसाठी तर ही ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरेल’ ‘साहित्यिकांना पाहून मुख्यमंत्र्यांची बोबडी वळली’ असेही छापून येईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी त्याला एकच दाद दिली.

अधिवेशन आणि संमेलन

दोन दिवस गोंधळ झाल्याशिवाय जसे विधिमंडळाचे अधिवेशन सुरळीत पार पडत नाही, त्याचप्रमाणे साहित्य संमेलनापूर्वी काही वाद होतात व नंतर संमेलन सुरळीत पार पडते, राजकारणी आणि साहित्यिक यांच्यात हे एक साम्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.