संपूर्ण देशासह महाराष्ट्रालाही अद्याप करोना विषाणूचा विळखा बसलेला आहे. आगामी गणेशोत्सवावरही या विषाणूचं सावट आहे. गणेशोत्सव म्हटलं की मुंबईतील चाकरमान्यांचे पाय कोकणाकडे वळतात. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. दरम्यान बाहेरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांना ७ ऑगस्टपर्यंतच प्रवेश देण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. याचसोबत ई-पास नसलेल्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं. यामुळे अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता होती. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका जिल्हाधिकारी यांनी घेतली.

यानंतर झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या लोकांना ७ दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्यात यावं असे आदेश दिले आहेत. करोनामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं असून सणांवरही करोनाचं संकट आलं आहे. यामुळेच कोकणात यंदा गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतले अनेक चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जात असतात, यासाठी रेल्वे विभाग विशेष गाड्याही सोडतं. परंतु सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या काळात रेल्वे वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी रस्त्यामार्गे प्रवास हा एकमेव पर्याय उरला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यत टाळेबंदीला आणखी एक आठवडा मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी संध्याकाळी काढल्यानंतर जिल्ह्यच्या विविध भागांत त्याचे तीव्र पडसाद उमटले. जनतेच्या जोरदार विरोधामुळे गुरुवारी हा आदेश लक्षणीय प्रमाणात शिथिल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यतील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतील दुकाने खुली ठेवण्यासाठी आराखडा मंजुरीबाबतचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक दिवसाआड डाव्या-उजव्या बाजूची दुकाने खुली राहतील. रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.