वीज बिलाची ३७ लाखाची थकबाकी भरली नाही म्हणून जिल्ह्य़ातील २० ग्रामीण पाणी पुरवठा योजना आठ महिन्यांपासून बंद असल्याने ३३ हजार ८८५ लोकांना कडक उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर ५२ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या आहेत. अशा ७२ पाणी पुरवठा योजना बंद असून जिल्ह्य़ात पाणी पुरवठा आराखडा केवळ कागदावर दिसत असून प्रत्यक्षात कामे थंडबस्त्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात दरवर्षी या जिल्ह्य़ाला पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीपासूनच टंचाई आराखडा तयार केला असला तरी वीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्य़ातील २० ग्रामीण पाणी पुरवठा योजना पूर्णत: बंद पडलेल्या आहेत. यात मासळ, पाहणी, तुकूम, वलणी, नंदगुर, कोष्टा, नागपूर, निंबाळा, पळसगाव, कवडजई, कोठारी, मोहाळी तुकूम, बामणी, दुधोली, आर्वी, कोरपना, लांबोळी, भारी, नोकेवाडा, टिटवी, गुडसेला या २० पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकडे वीज मंडळाचे ३७ लाखाचे वीज बिल थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे या सर्व २० योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने या योजना बंद पडलेल्या आहेत. ऑक्टोबर २०१४ मध्येच या योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तेव्हाच गावकऱ्यांनी वीज बिल भरून पुरवठा पूर्ववत सुरू करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. परिणामी, कडक उन्हाळ्यात ३३ हजार ८८५ लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. केवळ वीज बिलामुळेच या योजना बंद पडल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आत्राम यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
तसेच ५२ ग्रामीण पाणी पुरवठा योजना दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या आहेत. उन्हाळा सुरू होताच जिल्हा परिषदेने या ५२ योजनांच्या दुरुस्तीसाठी कंत्राट मागविले. मात्र, दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने व काही ठिकाणी कंत्राटदार काम करायला तयार नसल्यामुळे या योजना बंद आहेत. परिणामी, गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कडक उन्हाळ्यातील मे महिन्याचे दहा दिवस निघून गेल्यानंतरही पाणी पुरवठा दुरुस्तीची अनेक कामे प्रत्यक्षात झालीच नसल्याची धक्कादायक माहिती या निमित्ताने समोर आली आहे.
पाणी पुरवठा आराखडय़ानुसार विंधन विहिरींची २५० कामे मंजूर असतांना केवळ १२६ कामे पूर्ण झाली आहेत. पाणी पुरवठा योजनेची १०६ कामे मंजूर असतांना केवळ ५२ घेण्यात आली. यातही बहुतांश कामे अपूर्ण आहेत. विहिरीतील गाळ काढून स्वच्छ करण्यासाठी २८३ कामांना मंजुरी प्रदान केली होती. मात्र, यापैकी एकही काम सुरू झालेले नाही. तसेच २९ गावातील ३० खासगी विहिरी पाण्यासाठी अधिग्रहीत करण्यात येणार होत्या. मात्र, आजपर्यंत एकही विहीर अधिग्रहीत करण्यात आलेली नाही, तर १८ गावात टॅंकरने पाणी पुरवठा प्रस्तावित केला असला तरी एकाही गावात टॅंकर पोहोचला नसल्याची माहिती आहे.