सोलापूर जिल्ह्य़ात विधानसभेच्या ११ जागांसाठी सर्वत्र चुरशीने ६७.२२ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७५.३६ टक्के मतदान पंढरपुरात तर त्याखालोखाल ७५.२८ टक्के मतदान माढय़ात झाले. सर्वात कमी ५६.५३ टक्के मतदान सोलापूर शहर उत्तरमध्ये झाले. अर्थात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत ५९.९९ टक्के इतके मतदान झाले होते. तसेच मागील २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीतही ६२.०७ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा विधानसभेसाठी त्यापेक्षा जास्त विक्रमी मतदान झाले.
जिल्ह्य़ात एकूण ३२ लाख १,६५४ मतदारांपैकी २१ लाख ५२ हजार १४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १६ लाख ८६ हजार ९७० पुरुषांपैकी ११ लाख ५४ हजार २६६ तर १५ लाख १४ हजार ६५९ महिला मतदारांपैकी ९ लाख ९७ हजार ७४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्य़ात तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी २५ एवढी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ तीनजणांचे मतदान झाल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणेकडून अधिकृतपणे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दिसून आले.
सर्वाधिक ७५.३६ टक्के मतदान झालेल्या पंढरपुरात एकूण तीन लाख २,१७१ मतदार आहेत. यापैकी दोन लाख २७ हजार ७१६ इतके विक्रमी मतदान झाले. यात एक लाख १९ हजार ४६५ पुरुष तर ९० हजार १७८ महिला मतदारांनी मतदान केले. माढा येथे ७५.२८ टक्के मतदान झाले असून येथील एकूण दोन लाख ९६ हजार २१३ मतदारांपैकी दोन लाख २२ हजार ९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख ५७ हजार ९८४ पुरुषांपैकी एक लाख २१ हजार ३५० तर एक लाख ३८ हजार २२९ महिला मतदारांपैकी एक लाख १,६३९ मतदारांनी मतदान केले.
बार्शी येथेही ७२.६८ टक्के इतके चुरशीने मतदान झाले. यात एकूण दोन लाख ९० हजार ९६७ मतदारांपैकी दोन लाख ११ हजार ४८९ मतदान झाले. यामध्ये एक लाख ११ हजार ५७५ पुरुष तर ९९ हजार ९१४ महिला मतदारांचा समावेश आहे. मोहोळ राखीव मतदारसंघात ६६.८६ टक्के मतदान झाले असून यात एकूण दोन लाख ८५ हजार ९८२ पैकी एक लाख ९१ हजार २०० मतदान झाले. मतदान केलेल्या मतदारांमध्ये एक लाख ६,२७५ पुरुष व ८४ हजार ९२५ महिला मतदारांचा समावेश होता.
सोलापूर शहर उत्तरमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ ५६.५३ टक्के एवढेच मतदान होऊ शकले. एकूण दोन लाख ७१ हजार ४४९ मतदारांपैकी एक लाख ५३ हजार ४५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण एक लाख ३९ हजार २४८ पुरुषांपैकी ८१  हजार ५११ तर एकूण एक लाख ३२ हजार १८५ महिलांपैकी केवळ ७१ हजार ९४१ इतक्याच मतदारांनी मतदान केले. सर्वत्रच मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला.
लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातही मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. त्यामुळे केवळ ५८.९८ टक्के  मतदान होऊ शकले. एकूण दोन लाख ७८ हजार ११९ मतदारांपैकी एक लाख ६४ हजार ४१ एवढय़ाच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८४ हजार १५१ पुरुष व ७९ हजार ८९० महिला मतदारांनी मतदान केले.
अक्कलकोटमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण ६३.४६ इतके आहे. येथे एकूण तीन लाख ३२ हजार ३७२ मतदारांपैकी दोन लाख १० हजार ९२२ मतदारांनी मतदान केले. यात एक लाख ७४ हजार ३२१ पुरुषांपैकी एक लाख १३ हजार २१६ तर एक लाख ५८ हजार ४९ महिलांपैकी ९७ हजार ७०६ मतदारांनी मतदान केले. सोलापूर दक्षिणमध्ये ५८.३४ टक्के इतकेच मतदान झाले. एकूण दोन लाख ९६ हजार ३२४ मतदारांपैकी एक लाख ७२ हजार २९२ मतदारांनी मतदान केले. यात ९३ हजार ४१९ पुरुष तर ७८ हजार ८७३ महिला मतदारांचा समावेश आहे.
सांगोला मतदारसंघात ७१.४९ टक्के इतके चुरशीने मतदान झाल्याने तेथील निकालाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. या ठिकाणी एकूण दोन लाख ७० हजार १५१ मतदारांपैकी एक लाख ९३ हजार १४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख २९६४ पुरुष तर ९० हजार १७९ महिलांचा समावेश आहे. माळशिरस राखीव मतदारसंघात एकूण दोन लाख ९९ हजार ३३८ मतदारांपैकी दोन लाख २,७६२ इतक्या मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६७.७४ इतकी आहे. झालेल्या मतदानामध्ये एक लाख १० हजार ३०५ पुरुष तर ९२ हजार ४५७ महिला मतदारांचा समावेश होता.