सरासरी साडेतीन दिवसांआड पाणीपुरवठा

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

मराठवाडय़ातील ७९ शहरांना होणारा सरासरी पाणीपुरवठा साडेतीन दिवसाआड होत असल्याची आकडेवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे दिली आहे. मराठवाडय़ातील अहमदपूर नगरपालिकेतून १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर बीड जिल्ह्य़ातील वडवणी येथे १२ दिवसाआड, आष्टी, पाटोदा, परभणी, औसा या शहरांना १० दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होतो. उस्मानाबाद, रेणापूर या शहरांना अजूनही आठ दिवसाआडच पाणी मिळते. काही ठिकाणी पाणी उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी पाणी उपलब्ध असूनही त्याच्या पुरवठय़ाला गळती लागली आहे. परिणामी सरासरी साडेतीन दिवसाला एकदा मराठवाडय़ातील शहरी भागाला पाणी मिळते. टंचाईची तीव्रता ग्रामीण भागात थेट टँकपर्यंत पोहोचली आहे. सध्या ३७५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जायकवाडीत पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असला तरी औरंगाबाद शहराला चार दिवसाआड एकदा पाणी मिळते. कारण पाणीपुरवठय़ाची कोटय़वधी रुपयांची योजना भाजप-सेनेच्या राजकारणात अडकून पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ नगरपालिकांमध्ये साधारणत: तीन दिवसाआड एकदा पाणीपुरवठा होतो. सोयगाव वगळता अन्यत्र सर्व आठ नगरपालिका क्षेत्रांमध्ये कोठेही दररोज पाणीपुरवठा होत नाही. राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असणाऱ्या भोकरदन शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जुई मध्यम प्रकल्पात पाणी नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. भोकरदन हा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ आहे. डिसेंबर अखेपर्यंत कसाबसा पाणीपुरवठा होईल. त्यानंतर धरणाच्या पोटात चर खणावे लागतील आणि त्यातील पाणी वापरावे लागेल, असा अंदाज आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी पंचायतीत सध्या १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे दररोज पाच टँकर शहरात लावण्यात आले आहेत. गेवराईचा पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. शहागड बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतर पाणी सुरू केले जाईल, असे कळविण्यात आले आहे. पूर्णा नदीतून परभणी शहराला दहा दिवसाआड एकदा पाणी पुरवले जाते. गंगाखेडला सात दिवसाआड, अन्य सर्व शहरांमध्ये तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. हिंगोली, लातूर या जिल्ह्य़ाची स्थितीही अशीच आहे. लातूर जिल्ह्य़ात सर्वत्र सात ते आठ दिवसाआड एकदा पाणीपुरवठा केला जातो. उदगीर, औसा, निलंगा, चाकूर, शिरुर अनंतपाळ, देवणी, जळकोट, रेणापूर येथेही पाच दिवसाआड पाणी मिळते. त्यामुळे पाणी साठवणुकीसाठी नागरिकांची धावपळ सुरू असते. दुष्काळ असतानाही आणि नसताना पाणी काही येत नाही, अशी स्थिती सर्वत्र आहे.