राज्यात स्वाइन फ्लूने थमान घातले असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या २० संशयित रुग्णांपकी ८ रुग्णांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. याबाबत योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून ५ रुग्णालयात उपचारांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आर. बी. आरसूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण राज्यात स्वाइन फ्लूने थमान घातले आहे. राज्यात शंभरहून अधिक रुग्णांचा बळी स्वाइन फ्लूने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही स्वाइन फ्लूने शिरकाव केला असून सोमवारी पेठ वडगाव येथील प्रमिला बाबासाहेब पाटील (वय ४२ रा. पेठवडगाव) या प्राथमिक शिक्षिकेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे उघड झाले. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान जानेवारीपासून सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूचे २० संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळले असून यातील ८ रुग्णांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून खबरदारीच्या योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.