सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका ऑगस्ट महिन्यामध्ये ९१३ करोनाबाधीत रुग्ण आढळले असून एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये ३७४  रुग्ण आढळले आहेत. श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या चाकरमान्यांमुळे रुग्णांची संक्रमण स्थिती वाढली असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये करोना संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना ऑगस्ट महिन्यामध्ये करोना संक्रमणाने गाठले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील लोक बाधीत झालेले आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २८७ रुग्ण झाले आहेत. त्यात एका ऑगस्ट महिन्यामध्ये ९१३ रुग्णांचा समावेश झाला आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागरी क्षेत्रात संस्थात्मक अलगीकरणात ११ हजार ११५ तर ग्रामीण भागात १० हजार ९९९ अलगीकरणात राहिले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सोमवारी आणखी २२ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.