News Flash

‘एक जन्म, एक वृक्ष’चे प्रारूप आता राज्यभरात

‘एक जन्म, एक वृक्ष’च्या मॉडेलची आरोग्य विभागामार्फत राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

‘एक जन्म, एक वृक्ष’ मोहिमेप्रसंगी सेल्फी घेताना ए.एस. नाथन.

तमिळनाडूतील ए. एस. नाथन यांचा महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनाचा ध्यास; अकोल्यात मोहीम यशस्वी

अकोला : वाढते प्रदूषण व सातत्याने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनाचे महत्त्व ओळखून तमिळनाडूतील ध्येयवेडे ए.एस. नाथन महाराष्ट्रात झटत आहेत. वृक्षमित्र, समाजसेवी नाथन यांनी गेल्या चार वर्षांत अकोला जिल्हय़ात जनजागृती करून वृक्षरोपणाचे कार्य केले. गेल्या वर्षभरात ‘एक जन्म, एक वृक्ष’ ही विशेष मोहीम राबवली. या माध्यमातून जिल्हय़ात ५० हजारांवर झाडे लावून ती जगवण्यात आली आहेत. आता अकोल्यातील याच ‘एक जन्म, एक वृक्ष’च्या मॉडेलची आरोग्य विभागामार्फत राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या जनजागृतीसाठी ए.एस. नाथन संपूर्ण राज्य पालथे घालत असल्याने ते या मोहिमेचे खऱ्या अर्थाने ‘नाथ’ ठरीत आहेत. राज्यात वनविभागाच्या वतीने हरित महाराष्ट्र अभियान गेल्या चार वर्षांपासून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राबवण्यात येते. त्यामध्ये कोटय़वधींच्या संख्येने वृक्षारोपण होत असले तरी त्याच्या संवर्धनाबाबत प्रचंड उदासीनता दिसून येते. पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धानासाठी तमिळनाडूतील रामनाथपूरम् जिल्ह्य़ातील हरियानकोटई या गावातून आलेल्या ए.एस. नाथन यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे. सुमारे १२ वर्षांपूर्वी नाथन मुंबईत दाखल झाले. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सहायक दिग्दर्शक म्हणून ते कार्यरत होते. आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावल्यावरही त्यामध्ये त्यांचे मन रमले नाही. प्रदूषणाचा भस्मासुर आणि ढासळत चाललेलं पर्यावरण यामुळे ते चिंतित होते. पर्यावरणाच्या ऱ्हासाची केवळ काळजीच न करता त्यासाठी प्रत्यक्ष कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला. २७ फेब्रुवारी २०१५ ला नाथन यांची नागपूर येथे नीरी या संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. डॉ. भटकरांनी नाथन यांना केवळ कायद्यासाठी प्रयत्न न करता प्रत्यक्षात कृती करण्याचा सल्ला दिला.

अकोल्यातून सुरुवात

अकोला जिल्ह्य़ातून वृक्षारोपणाच्या कार्याला सुरुवात करण्याचेही त्यांनी सुचवले. त्यानुसार नाथन यांनी अकोला जिल्हा गाठून वृक्षसंगोपनाचे कार्य सुरू केले. शासनाकडून होत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही, हे नाथन यांनी जिल्हा प्रशासनाला पटवून दिले. त्यामुळे जिल्ह्य़ातील सातही तालुक्यांत अधिकाऱ्यांच्या मदतीने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम सुरू झाली. प्रत्यक्ष गावात, शहरांमध्ये जाऊन त्यांनी वृक्षारोपणाला प्रोत्साहित केले. ‘ज्या घरात एक बाळ जन्माला येईल, त्याच्या नावाने एक वृक्ष लावून त्या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी त्या कुटुंबाने घ्यायची, दर वर्षी आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा करताना त्या वृक्षाचाही वाढदिवस साजरा करायचा,’ अशी कल्पना त्यांनी प्रत्यक्षात साकारली. सुरुवातीला त्या वृक्षाची काळजी घेतल्यास ते देखील १०० वर्षे जगून आपल्याला त्याचे फळ देईल, याची जाणीव त्यांनी बाळाचा जन्म झालेल्या कुटुंबाला करून दिली. आता ज्या कुटुंबात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्या वतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. या वृक्षाचे जतन करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका त्या कुटुंबास प्रोत्साहित करत असून, या प्रयोगामुळे जिल्ह्य़ात वृक्ष लागवडीस भरीव मदत होत आहे. या माध्यमातून आतापर्यंत ३० हजारांवर झाडे लावण्यात आली आहेत.

आता हेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे. अकोला जिल्ह्य़ात सुरू असलेले ‘एक जन्म, एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण राज्यात करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचना त्यांनी एका परिपत्रकाद्वारे जारी केल्या आहेत.

राज्यात मोहीम

आशा स्वयंसेविका गर्भवती महिला असलेल्या कुटुंबातील सदस्यांना प्रसूतीनंतर वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त करतील. बाळाचेच नाव त्या वृक्षाला देण्यात येईल. त्यामुळे वृक्षाविषयी आपुलकी निर्माण होईल. बाळाच्या वाढदिवसासोबतच वृक्षाचाही वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाला प्रोत्साहित केले जाईल. आशा स्वयंसेविका वेळावेळी भेट देऊन वृक्षाची पाहणी करतील. दरमहा वृक्षांच्या लागवडीचा जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर आढावा घेण्यात येईल.

वृक्षारोपणाच्या कायद्यासाठी प्रयत्न

देशात वृक्षारोपणाचा कायदा यावा, यासाठी भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए.एस. नाथन यांनी २०११ पासून प्रयत्न केले. अनेक राजकीय नेते व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून वृक्षारोपणाच्या कायद्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपणाच्या क्षेत्रात व्यापक कार्य करण्याचा निर्णय घेतला.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन फारच गरजेचे आहे. याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाला होण्यासाठी शासनाकडून वृक्षारोपणाची सक्ती करण्यात यावी. अकोला जिल्हय़ातील ‘एक जन्म, एक वृक्ष’ ही मोहीम आता राज्यभर राबवण्यात येणार असल्याने वृक्षारोपण मोहिमेला अधिक बळ मिळेल.

– ए. एस. नाथन, संस्थापक, भारत वृक्ष क्रांती मोहीम.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:05 am

Web Title: a birth one tree model will be implemented by the health department throughout maharashtra
Next Stories
1 सारेच राजकीय पक्ष सुरेश जैन यांच्या दावणीला
2 औरंगाबादची कर्जमाफी विदर्भातल्या जिल्ह्य़ातून
3 चांदीच्या वस्तऱ्याने ‘तो’ करतो जवानांची नि:शूल्क दाढी
Just Now!
X