धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यात काही वेळापूर्वी एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळून अपघात झाला. या घटनेत वैमानिकासह दोनजण जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातील शेवाळी या गावाच्या फाट्याजवळ असलेल्या एका शेतात हे विमान कोसळले, या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले असावे अशी माहितीही मिळते आहे. विमानात बिघाड झाल्याचे समजताच वैमानिकाने विमान लोकवस्तीपासून लांब अंतरावर नेले. वैमानिकाला काय होणार आहे हे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. धुळे येथील फ्लाईंग क्लबचेच हे विमान होते. मात्र विमान नेमके कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी चालले होते आणि बिघाड नेमका का झाला? याचे कोणतेही कारण अद्याप समजू शकलेले नाही. या विमानात पायलटसह एकूण ६ लोक बसले होते अशीही माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात येतो. या विमानात एकूण सहाजण बसले होते. यापैकी दोघांना जास्त मार लागला आहे त्यामुळे या दोघांना साक्री येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पायलटही जखमी झाला आहे. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे अशीही माहिती समोर आली आहे.