राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी निधन झाले. फुंडकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. फुंडकर यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा…

पांडुरंग फुंडकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी झाला. ते मूळचे नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील रहिवासी होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी तीन महिने तुरुंगातही काढले. यानंतर मिसाबंदी म्हणूनही नऊ महिने ते तुरुंगात होते.

विदर्भात भाजपाचा प्रसार करणारे फुंडकर
१९७७ मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रीय झाले. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाऱ्या पहिल्या चार आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. १९७८ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. १९८३ मध्ये कापूस प्रश्‍नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. त्या बालेकिल्ल्याला फुंडकर यांनी सुरुंग लावला. आमदार, खासदार झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्याकाळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपाचे स्थान मजबूत केले.

गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आणि अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय
पांडुरंग फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. मुंडे आणि फुंडकर यांची मैत्री सर्वश्रृत होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फुंडकर यांनी केलेले आंदोलन गाजले होते. अकोलामधून १९८९- ९८ या कालावधीत ते लोकसभेवर निवडून गेले. याच कालावधीत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दिग्गज नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढला. यामुळेच त्यांनी फुंडकर यांच्यावर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी दिली.

भाऊसाहेब यांच्याकडील जबाबदारी
कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे. ११ एप्रिल २००५ ते २४ एप्रिल २००८ या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. २५ एप्रिल २००८ रोजी त्यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. जून २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन २००६-०७ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एप्रिल २०१४ मध्ये त्यांची विधान परिषदेवर फेरनिवड करण्यात आली.

अखेर मंत्रिपद मिळाले
भाजपातील महत्त्वाच्या पदांवर काम केले असले तरी फुंडकर यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. एकनाथ खडसे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्याने खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर २०१६ मध्ये फुंडकर यांना मंत्रिपदावर संधी देण्यात आली. कृषिमंत्री म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.