चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद विद्यालयाचे मुख्याध्यापक लिंगू मेश्राम(४९), हे दुचाकीने शाळेत जाताना त्यांना ट्रॅक्टरने जबर धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दहावीचा पेपर देणाऱ्या बहिणीला आणण्यासाठी जात असलेल्या रौनक वीर बहादूर सिंग (१४) या विद्यार्थ्यांचा पडोली येथे ट्रकने चिरडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना बुधवारी घडल्यात. या घटनांमुळे शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी धानोरा येथील शाळेत जाण्यासाठी लिंगू मेश्राम हे सकाळी राजुरा येथील अंगदनगर येथील निवासस्थानाहून दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए एन ११२४ ने निघाले. नलफडी ते सिंधी दरम्यान एका ट्रॅक्टरने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला. चालक मंगेश कोडापे, राहणार राजुरा याला विरुर स्टेशन पोलिसांनी दुपारी अटक केली. ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ एबी ४११४ हा राजुरा येथील उमेश मारशेट्टी यांच्या मालकीचा असल्याचे कळते. मंगळवारीच लिंगू मेश्राम यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. परंतु आज ही दुर्दैवी घटना घडली. मेश्राम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. घटनेचा तपास विरुर ठाण्याचे ठाणेदार कृष्णकुमार तिवारी व उपनिरीक्षक सदानंद वडतकर हे करीत आहेत.