नांदेड : नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाणाऱ्या काशीनाथ भिमा राठोड (६५) व सुलोचना काशीनाथ राठोड (६०) रा.माळआसोली (धनज) ता. उमरखेड या दांपत्याच्या मोटारसायकलला ट्रकने धडक दिल्याने त्यांची मोटरसायकल समोरून येणार्‍या दुसर्‍या मोटरसायकलवर धडकली. या तिहेरी विचित्र अपघातात विदर्भातील पती-पत्नी दुचाकीस्वार रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मरण पावले असून हदगाव तालुक्यातील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून कोणतीच एक बाजू पुर्ण झाली नसल्याने जागोजागी वळणे, धुरड्याने काहीच दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपला जीव गमावला लागला आहे. गेल्या एक वर्षापासून काम बंद असल्याने वाहनचालक व जनतेला अनेक अडचणी येत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

२८ रोजी सकाळी काशीनाथ भिमा राठोड वय ६५ व सुलेचना काशीनाथ राठोड वय ६० रा.माळआसोली (धनज) ता. उमरखेड येथुन बामणी तांडा ता. हदगांव येथे नातेवाईकांच्या अंतविधी साठी जात असताना मानवाडी ते पळसा दरम्यान सकाळी आठ वाजता ट्रक व मोटारसायकलची धडक झाली. एकाच बाजुच्या रस्त्यामुळे पाठीमागून असलेल्या बरडशेवाळा ता. हदगांव येथील अवधूत संजय वटाणे व प्रशांत लक्ष्मण यमकुरे हदगावकडे जात असतांना पडलेल्या मोटर सायकलवर आदळले. बरडशेवाळा येथील अवधूत वटाणे गंभीर जखमी तर प्रशांत यमकुरे किरकोळ जखमी झाले. ट्रकसह चालक फरार झाला असून जखमीला शासकीय रुग्णवाहिकेतून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना दाखल करण्याअगोदरच काशीनाथ राठोड व सुलेचना राठोड दोघे पती व पत्नीने जगाचा निरोप घेतला. तसेच अवधूत वटाणे यांच्या वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकल्प संचालक व मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
गेल्या एक वर्षापासून काम बंद असल्याने रस्ता कामात ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कोणतीच एक बाजू पुर्ण झाली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने आता तर काम कधी पुर्ण होणार याची शाश्वती दिसत नसल्याने लोकप्रतिनिधी, प्रकल्प संचालक व संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने दखल घ्यायला हवी अशा भावना वाहनचालक व जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहेत.