मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. हा अपघात आज (रविवार) दुपारी तीनच्या सुमारास कार्लाजवळ झाला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, स्वीफ्ट कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दोघा जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने मारूती स्वीफ्ट कार  (एमएच १४ सीएक्स ८३३९) जात होती. कार्लाजवळ आल्यानंतर भरधाव जात असलेल्या स्वीफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या दुभाजक तोडून लेनमध्ये घुसली. त्यावेळी समोरून येणाऱ्या सँट्रो (एमएच १२ इएक्स १६८२) कारला धडक दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. नियंत्रण सुटल्याने स्वीफ्ट कार दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन सँट्रोला समोरून धडकली. या भीषण अपघातात स्विफ्ट कारमधील तिघे तर सँट्रो कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.  पाऊस सरू असल्याने मदत कार्यात अडचण आली होती.

स्वीफ्ट कारमधील मृतांची नावे अशी संजीव मोहनसिंग कुशवाह (वय १७), कृष्णा रमेश शिरसाठ (वय २२), निखिल बालाजी सराेदे (वय २०, रा. सर्व जण श्रीनगर, रहाटणी, पुणे). तर सँट्रो कारमधील मृत- राजीव जगन्नाथ बहिरट (वय ५२), सोनाली राजीव बहिरट (वय ४६), जान्हवी राजीव बहिरट (वय २०), जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय ८३, रा. सर्वजण सर्व्हे नं ५२, कलाशंकर नगर, बीटी कवडे नगर, मुंढवा, पुणे ). या अपघातात प्रतिक बालाजी सरोदे (वय १८), आकाश मदने (वय १७) आणि रोहित कड (वय १६, सर्व रा. पुणे)  ही जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कन्हे फाटा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.