परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसच्या उजव्या बाजूचा काही भाग समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मालमोटारीने  कापल्याने बसमधील तीन प्रवासी जागीच ठार तर १५ जण जखमी झाले. कोंबडय़ांची वाहतूक करण्यासाठी बसवलेल्या लोखंडी जाळीने बसचा पत्रा कापल्याने हा भीषण अपघात झाला. केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव येथे मंगळवारी दुपारी हा अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तिघे मृत लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यतील आहेत.

बीड जिल्ह्यतील चंदन सावरगाव (ता.अंबाजोगाई) येथे मंगळवारी दुपारी औरंगाबादकडून केज माग्रे मुखेडकडे (जि.नांदेड) जाणाऱ्या बसला (एमएच२०-बीएल३७२१) अंबाजोगाईकडून भरधाव वेगात येणाऱ्या मालमोटारीने जोराची धडक दिली. मालमोटारीच्या पाठीमागील बाजूला कोंबडय़ांची वाहतूक करण्यासाठी लावलेल्या लोखंडी जाळीने बसच्या उजव्या बाजूचा पत्रा कापला. यात  खिडकीजवळ बसलेले प्रवासी अपघातग्रस्त झाले. त्यात शाम राजगिरवाडी (वय ३७ रा. जळकोट जि. लातूर), विजया बाळासाहेब देशमुख (वय ५५, रा. मुखेड, जि.नांदेड), अनिल मोतीलाल कोळकर (वय ५०, मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. पंधरा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

बस आणि मालमोटार समोरासमोर आल्यानंतर काही क्षणात बसचा अर्धा भाग पुढे गेल्यानंतर लोखंडी जाळीने बाजूच्या खिडक्या कापल्या. त्यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यांनाच जास्तीचा मार लागला. भरधाव वेगातील बस एकदम थांबल्याने इतर प्रवासीही मोठय़ा प्रमाणात जखमी झाले तर मालमोटार रस्त्यावर आडवी झाली.