ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात शिकार झाल्यानंतर भारतीय वन कायद्याच्या ३९ कलमान्वये सर्वसामान्यांनी ४८ तासाच्या आत वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. ताडोबातील चितळ शिकार प्रकरणात मानद वन्यजीव रक्षक असतांनाही पूनम धनवटे यांनी शिकारीची माहिती वनखात्यापासून लपवून ठेवल्याने त्यांचे पद धोक्यात आले आहे. दरम्यान, शेतीचा सातबारा तलाठय़ाकडून मागविला असून शेत धनवटे यांच्याच नावावर असेल तर त्यांना चौकशीसाठी बोलावू व चौकशीअंती त्यांचे पद काढून घ्यावे, असा अहवाल शासनाला सादर करू, अशी माहिती सहायक उपवनसंरक्षक सोरते यांनी दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलातील तळोधी नाईक येथे २८ मे रोजी एका चितळाची शिकार वीज प्रवाह सोडून करण्यात आल्याचे वन विभागाच्या प्राथमिक चौकशीत समोर आल्याची माहिती सहायक उपवनसंरक्षक सोरते यांनी लोकसत्ताला दिली. तळोधी नाईक येथील हे शेत मानद वन्यजीव रक्षक पूनम धनवटे यांच्या मालकीचे आहे. त्यांनी या शेताच्या रक्षणार्थ नऊ कर्मचारी तैनात केले होते. यातील चार दिवसा व चार रात्र पाळीत काम करायचे, तर एक कर्मचारी हा २४ तास कामावर असायचा. शिकारीची घटना उघडकीस आल्यानंतर अंकूश राऊत, गोमा मसराम, पांडूरंग मसराम, अरविंद वाघाडे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच दोन कॅमेरा ट्रॅप, चार फासे व अन्य काही साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मानद वन्यजीव रक्षक पूनम धनवटे वाघाने चितळाची शिकार केल्याचे सांगत आहेत. मात्र, चितळाच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्याच्या कोणत्याही खूणा दिसत नाहीत. चितळाचे डोके, चार पाय पूर्णत: शाबूत आहेत. केवळ मांडीवर वीज प्रवाहाचे चटके दिसतात, असे सोरते यांनी सांगितले. यावरूनच वीज प्रवाह सोडून ही शिकार केली गेली आहे. शिकार झाली, हे सत्य असून मानद वन्यजीव रक्षक म्हणून त्यांनी तात्काळ माहिती देणे, हे त्यांचे आद्यकर्तव्य होते, परंतु त्यांनी वन विभागाला याबाबत कुठलीही माहिती दिली नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात किंवा जंगलात एखाद्या प्राण्याची शिकार झाली, तर भारतीय वन कायद्याच्या ३९ व्या कलमान्वये सर्वसामान्यांनी ४८ तासात वन विभागाला कळवावे, असा कायदा आहे. धनवटे या तर मानद वन्यजीव रक्षक आहेत व गेल्या कित्येक वर्षांंपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना या कायद्याची पूर्णपणे माहिती असतानाही त्यांनी ही माहिती वनखात्यापासून दडवून ठेवल्याने त्याही तेवढय़ाच गुन्हेगार आहेत, असेही सोरते म्हणाले.
दरम्यान, चितळाची शिकार सापडली त्या शेतीची कागदपत्रे, सातबारा तलाठय़ाकडून मागविलेला आहे. उद्या सोमवारी किंवा मंगळवारी शेतजमिनीची कागदपत्रे मिळतील. हे शेत धनवटे यांच्या मालकीचे असेल तर त्यांनाही चौकशीसाठी बोलावू. शिकारीसारख्या गंभीर गुन्ह्य़ाची माहिती लपवून ठेवणारा मानद वन्यजीव रक्षक नको, ही बाब तेवढीच सत्य असल्याने त्यांचे पद काढून घेण्यात यावे, असा अहवालही शासनाकडे सादर करू, असेही सोरते लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले. शिकार ही फार गंभीर बाब आहे. ताडोबाच्या संरक्षित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक वन्यजीवप्रेमी व व्यक्तीने वन विभागाला प्रकल्पातील सकारात्मक व नकारात्मक घटना कळविणे, हे त्यांचे कर्तव्यच आहे. मात्र, प्रकल्पाच्या जीवावर मोठे झालेले वन्यजीवप्रेमीच वन्यजीवांच्या जीवावर उठल्याची प्रतिक्रिया काही वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशीही मागणी वन्यजीवप्रेमींनी लावून धरली आहे.