22 September 2020

News Flash

पाथरीत साई जन्मभूमी विकासासाठी कृती समिती

आमदार बाबाजानी दुर्रानी यांची या कृती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

शिर्डीकरांच्या विरोधानंतर नागरिक एकवटले

परभणी : साई जन्मभूमीच्या विकासासाठी प्रस्तावित केलेल्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर ‘साई जन्मभूमी’चा वाद चांगलाच पेटला असून गुरुवारी (१६ जानेवारी)  पाथरीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत शिर्डीकरांकडून जन्मभूमीला होणाऱ्या विरोधावर चर्चा झाली. तर जन्मभूमीच्या विकासासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली. आमदार बाबाजानी दुर्रानी यांची या कृती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

साई जन्मभूमी असलेल्या पाथरी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील बैठकीत १०० कोटींच्या विकास आराखडय़ास मंजुरी दिल्याचे जाहीर केले होते. या घोषणेनंतर शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद निर्माण झाला आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे, असे  मानले जाते.  याठिकाणी  भव्य असे मंदिरही  निर्माण करण्यात आले आहे. मात्र  पाथरी ही  साईबाबांची जन्मभूमी  नसल्याचे  शिर्डी संस्थानच्यावतीने सांगितले जात आहे.  या पार्श्वभूमीवर  नवा वाद निर्माण झाला आहे. पाथरीचा विकास झाल्यानंतर  शिर्डीचे महत्त्व कमी होईल, या कल्पनेमुळे शिर्डीकरांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नसल्याचे विधान करून वाद सुरू करण्यात आला आहे, अशी भावना कृती समितीच्या बैठकीत व्यक्त झाली. या पार्श्वभूमीवर नुकतीच गुरुवारी साई मंदिरात सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व पाथरीकरांची बैठक झाली. आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले, मंदिर विश्वस्त संजय भुसारी, शिवसेना तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, चक्रधर उगले, सदाशिव थोरात, उद्धव नाईक आदींसह विविध राजकीय पक्षाचे कार्यकत्रे, पदाधिकारी, सामाजिक कार्यकत्रे व सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती. या वेळी संजय भुसारी यांनी साईबाबांच्या जन्मभूमीबाबतची सर्व माहिती सांगून जन्मभूमीच्या विकासासाठी कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या वेळी सर्वानुमते आमदार बाबाजानी दुर्रानी यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

शिर्डीकरांनी मनाचा मोठेपणा दाखवावा

‘साईबाबांच्या श्रद्धा व सबुरी या शिकवणीप्रमाणे शिर्डीवासीयांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. पाथरीचा विकास झाला म्हणजे शिर्डीचे महत्त्व कमी होईल असे नाही. मात्र, त्यासाठी शिर्डीकर यांनी मोठे मन दाखवण्याची गरज आहे. त्यांनी उदार मनाने पाथरी या साईबाबांच्या जन्मभूमीला मान्य करावे. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सर्वाना मान्य आहे. गेल्या ३० वर्षांपासून असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत.’

-बाबाजानी दुर्रानी, आमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:21 am

Web Title: action committee for the development of saibaba birthplace in pathri zws 70
Next Stories
1 कर्नाटक पोलिसांना चकवा देत राज्यमंत्री यड्रावकर बेळगावात
2 शिवभोजनानंतर लोकांना दारू पाजणार का?
3 ‘वंचित’च्या सत्तेसाठी भाजपचा अप्रत्यक्ष हातभार
Just Now!
X