नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल असं उत्तर अभिनेता सुमीत राघवन यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला दिले आहे. आज विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर झाली. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं. ‘महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे आणि तुमचं सरकार निवडण्याची संधी आता तुमच्याकडे आहे.’ “हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवण्याची ” या आशयाचं एक ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं. ज्यावर उत्तर देत अभिनेता सुमीत राघवन यांनी ‘नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल’ असे उत्तर दिले आहे. तसेच #येरेमाझ्यामागल्या असेही लिहिले आहे.

आजच सुमीत राघवन यांनी मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे. २५/२५ मीटर मुंबईच्या पोटात उतरुन मुंबईकरांचं आयुष्य सुकर करणाऱ्या कामगारांचे आभार मानायचे आहेत असंही सुमीत राघवन यांनी म्हटलं आहे. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला उत्तर देणारे त्यांचे ट्विटही गाजते आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटवर फक्त सुमीत राघवन यांनीच नाही तर अनेकांनी उत्तरं दिली आहेत. यातली अनेक उत्तरं मजेशीर आहेत.

‘आधी आमचं कल्याण डोंबिवली खड्डेमुक्त करा, मग नवीन महाराष्ट्र घडवायचं बघा..’, ‘ हीच ती वेळ मुंबईकरांना सतावणाऱ्या खड्ड्यांची आठवण करुन देण्याची’, ‘ अगदी बरोबर. नवा महाराष्ट्र, सेना भाजपा युती नकोच ‘, ‘ किती वर्ष झाली हा शेवटचा डायलॉग मारुन? कमीत कमी टॅगलाईन तरी चेंज करा रे ‘, ‘मी खड्ड्याचा, खड्डा माझा जरा जमिनीवर या.. मातोश्रीच्या मखमली दुनियेतून’ या आणि अशा प्रकारचे अनेक रिप्लाय नेटकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहेत.