तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत चाललेल्या भारतात तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे यासारख्या व्यसनांना प्रतिष्ठा मिळणे हे दुर्दैवी असून, अशा व्यसनांपासून लोकांना दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याची अपेक्षा सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एस. गायकवाड यांनी व्यक्त केली. व्यसनमुक्तीपर प्रबोधनात कृष्णा विद्यापीठाचे कार्य निश्चितच स्वागतार्ह असल्याची प्रशंसा त्यांनी केली.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दंतविज्ञान अधिविभागातील सामाजिक दंतशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कराड शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या तंबाखू-सिगारेटविरोधी सह्यांच्या मोहिमेला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तंबाखू व्यसनविरोधी रॅलीचा न्या. बी. एस. गायकवाड यांच्या हस्ते झेंडा फडकावून प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते. कृष्णा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा दंतविज्ञान अधिविभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवकुमार के. एम., सहयोग प्राध्यापिका डॉ. स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, की ‘कृष्णा’मधील सामाजिक दंतशास्त्र विभागाने गेल्या ४ वर्षांत एक लाख नागरिकांची विनामूल्य दंतचिकित्सा करून, अनेकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजातील विविध घटकांनी अशा उपक्रमांना बळ दिल्यास तंबाखूमुक्त भारत व्हायला वेळ लागणार नाही.\