करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारकडूनही फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र, युवक काँग्रेसनं मोठा आवाज असणारे व धूर करणाऱ्या फटाक्यांवर बंदी कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे.

धूर करणाऱ्या फटाक्यांमुळे करोना रुग्णांना त्रास होण्याचा धोका लक्षात घेऊन राजस्थान सरकारनं फटाक्यांवर बंदी घातली आहे. त्यानंतर इतरही काही राज्यांनी असाच निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्यात फटाके बंदीचा निर्णय होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा- दिवाळीसाठी ठाकरे सरकारनं जारी केली नियमावली

आरोग्य विभागानं यासंदर्भात प्रस्तावही तयार केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. सरकारकडून सध्या फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन करण्यात आलं आहे. युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती, कृपया मोठे आवाज करणाऱ्या व धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लास्टिकवर ज्या पद्धतीनं बंदी घातली. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील,” अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.

फटाकेबंदीबद्दल सरकारची भूमिका काय?

“राज्यात करोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य कृतीदल व ‘डेथ ऑडिट कमिटी’ची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. या बैठकीत करोनामुळे होणारा मृत्युदर कमी करणे आणि संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला. थंडी आणि दिवाळीतील फटाके यामुळे प्रदूषण वाढण्याचा धोका असून त्याचा सर्वाधिक त्रास करोना रुग्णांना होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याबाबतच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. मात्र, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आणि गर्दी टाळा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं.