News Flash

“बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करा”

"धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोपही धक्कादायक होता आणि ज्यापद्धतीने तक्रार मागे घेतली ते देखील तितकंच धक्कादायक आहे"

“धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोपही धक्कादायक होता आणि ज्यापद्धतीने तक्रार मागे घेतली ते देखील तितकंच धक्कादायक आहे. बलात्काराचा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेल, त्यामुळे खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करावी” अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्याचं वृत्त येताच चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. “खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप-गुन्हे दाखल करत असतील तर त्यामुळे खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो…हे समाजाच्या हिताचं नाहीये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ IPC192 नुसार कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आणखी वाचा- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मा यांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने काल(दि.२१) मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव आणि प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने लेखी निवेदन दिलं. काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा नामक महिलेनं मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता. रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशीही चर्चा होती. पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 9:40 am

Web Title: after renu sharma withdraws rape case against dhananjay munde bjp leader chitra wagh demands to take action against renu sharma for fake rape complaint sas 89
Next Stories
1 धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मा यांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार
2 ग्रंथ निवड समिती वादाच्या भोवऱ्यात
3 चंद्रपूर जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतींत ७८१भूखंड रिकामे
Just Now!
X