धूळपेर नुकसानीचे पंचनामे करून नोंद घ्यावी, वंचित गारपीटग्रस्तांचे अनुदान तत्काळ वाटप करावे, या मागणीसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पेडगाव फाटा येथे दीड तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परभणी-पाथरी राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
मान्सून लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला शासन व प्रशासन जबाबदार आहे. रोजगार, पाणीटंचाई, वित्तसाह्य़ या बाबत कोणतीही उपाययोजना अमलात आणली जात नाही. मजुरांना रोजगार नाही, शेतकरी चिंतेत आहे. मजुरांनी रितसर कामाची मागणी केल्यानंतरही कामे दिली जात नाहीत. त्यामुळे मजुरांना तत्काळ बेरोजगार भत्ता द्यावा, रोहयोची कामे पेडगाव, भोगाव, एकरुखा, िपपळगाव स. येथे सुरू करावीत, पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी दुधना पात्रात पाणी सोडावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.
तहसीलदार रुईकर व गटविकास अधिकारी गोपाळ यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. भाकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर, अॅड. लक्ष्मण काळे, कॉ. सुभाष तरफडे, विश्वंभर देशमुख, अण्णा कुराडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.