पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पवारांचा झंजावात

पंढरपूर : परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वत:चं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिली जाते अशी मिश्कील शब्दात केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडे बोल सुनावले. ते पंढरपूर येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते.त्या वेळी ते बोलले. तसेच, भाषणात त्यांची भाजपा नेत्यावर बोलताना जीभ घसरली.

भाजपाचे पण पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादी  कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.काळे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.मात्र सत्ता बदलल्या नंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला आणि राष्ट्रवादीचे घडय़ाळ हाती बांधले.या वेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.या वेळी पवार यांनी तुफान फटकेबाजी करीत भाषण केले.

पवार म्हणाले,की परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वत:चं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिली जाते.आपल्याकडे यंत्रणा आहे. ‘सीरम’वर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते. तसेच १८ वर्षांंच्या पुढील लोकांना लस द्या असंही अजित पवार म्हणाले. कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं.भाजपमध्ये कल्याणरावचे कल्याण झाले का? आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करायला लागल्यावर घरी चकरा मारायला लागल्याची टीका त्यांनी या वेळी भाजप नेत्यांवर केली.

वाझेंचे आरोप धादांत खोटे: पवार

सचिन वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. त्याचे माझे कधी संभाषण नाही. तरीदेखील हा माणूस माझ्यावर आरोप करतो आहे. वाझे करीत असलेले सर्व आरोप खोटे असून त्याने केलेल्या आरोपाची चौकशी करा. यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी भूमिका अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

 

भाजपाचे नेते कल्याण काळे यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना अजित पवार.