मागील काही दिवसांपासून गैरव्यवहाराच्या आरोपांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात सारथी संस्था चर्चेत आहे. सारथीवरून विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. सारथी संदर्भातील वाद वाढ असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला असून, सारथी संबंधित मुद्यांवर उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना अजित पवारांना फोन केला असून, या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे.

सारथी संस्थेवरून राज्यात नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. सारथीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सारथीचा प्रश्न सातत्यानं मांडत असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना हजर राहण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची मागण्यासंदर्भातील पोस्ट

सारथीसंदर्भात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक!

मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थे बाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणी दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला फोन करून मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली. काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जी आश्वासने सरकारने दिली होती. ती न पाळल्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी समाजाचे हित सर्वोच्च आहे.
समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जाहीर आहेत. पैकी ,
1) सारथी ही ‘स्वायत्त’ संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्तते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

2) जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत.

3) शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्यामध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथी ची जाणीव पूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.

4) तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी.

5) ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी.

6) शासनाने नवीन कोण कोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात.
गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली ही संस्था स्वायत्त तर राहिली पाहिजेच. पण तिला जास्तीत जास्त निधी दिला गेला पाहिजे.

वरील प्रमुख मागण्या ह्या प्रथमदर्शनी मला दिसल्या. या व्यतिरिक्त अजून काही मागण्या असतील तर जाणकारांनी त्या मला कळवाव्यात. कंमेंट बॉक्स मध्ये व तसेच,
office@sambhajichhatrapati.com या इमेल वरती आपण लवकरात लवकर पाठवणे इष्ट राहील.