तीन वर्षांपासून महाराष्ट्र सरकारचा अभ्यास सुरु आहे, पास होण्याचे काही नाव नाही. आता लहान लेकरांना प्रश्न पडला आहे की आम्ही पास होतो आहोत तरीही सरकार का पास होत नाही, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरुच आहे. याच हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडे लोहा दौऱ्यावर होते त्याचवेळी अजित पवारांनी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले. एवढेच नाही तर त्यांनी शिवसेनेवरही टीका केली.

राष्ट्रवादीने १५ वर्षे काँग्रेससोबत सरकार चालवले. मात्र एका पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी स्टेजवर गेला नव्हता. शिवसेनेचे नांदेडचे आमदार भाजपचा प्रचार करताना दिसले होते. सेनेच्या वाघाचे आता कासव झाले आहे अशीही टीका अजितदादांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही अजित पवार आक्रमक झाले. सरकार एकीकडे ग्रामीण भागात वीजेच्या जोडण्या तोडून टाकते आणि दुसरीकडे पाण्याचे दर वाढवते. बावचळलेल्या सरकारकडे कृषीविषयक धोरणच नाही. तीन वर्षात निकृष्ट दर्जाची बांधकामे झाली आहेत.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारवर ताशेरे झाडले. राज्यातले सरकार खोटे बोला पण रेटून बोला असे आहे. रेटून बोललेले खोटे गळून पडून खरे रूप दिसू शकते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मेकअपवर लाखो रूपयांचा खर्च केला जात असावा असा टोलाही लोहा येथे झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी लगावला. कालच या धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोघांनी मराठवाड्यातील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेल्फी काढून चंद्रकांत पाटील यांना पाठवला. तर आता आज झालेल्या सभेत या दोघांनीही शिवसेना आणि भाजपचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.