सध्याचे सरकार हे लबाड लांडग्याप्रमाणे ढोंगीपणा करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते मंगळवारी उस्मानाबाद येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारवर आगपाखड केली.

सरकारने शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडता कामा नये. मी सरकारी अधिकाऱ्यांनाही वारंवार ही गोष्ट सांगत असतो. आमचा शेतकरी वीज बिलाचे पैसे बुडवणारा नाही. मात्र, तरीही सरकारने शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिली. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देऊन सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन केले. आपलं सरकार सत्तेत यायला पाहिजे. यापूर्वी केवळ दोनच आमदार निवडून दिले होते, तसे करू नका. मला यावेळी राष्ट्रवादीचे सर्व आमदार निवडून यायला हवेत. सध्याच्या सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. निवडणूका आल्या की, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तर कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते, असे अजित पवार यांनी म्हटले.

मराठवाड्यासोबत सरकार दुजाभाव का करत आहे, याचे उत्तर द्यावे. आपल्या शेजारचं लहान राज्य २४ तास वीज मोफत देत असेल तर आम्हाला निदान ८ तास तरी वीज उपलब्ध करून दया. मात्र, आमचे मुख्यमंत्री उलट शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या मागे लागले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. आगामी निवडणुकामध्ये आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या सरकारला गाजर भेट दया आणि त्यांच्यासोबत फसव्या आश्वासनांमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला मुळा भेट दया, मग ते खात बसा, नाहीतर एकमेकांना दाखवत बसा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

या सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केला. देशाचा प्रमुख आणि राज्याचा प्रमुख तुझ्या दारात येवून खोटं बोलत असेल तर या दोघांची सत्ता उलथवून टाकण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दे, असं साकडं आई भवानीला आम्ही घातल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. आजची अतिविराट सभा आई भवानीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला कौल आहे. आई भवानीचे दर्शन घेत आणि मराठवाडयाची माती कपाळी लावून राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजप-सेना हे सगळे महाचोर असून सगळा महाराष्ट्र लुटून खात असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.