लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेकर नागरिक निरुत्साही आहेत, असा अजब तर्क जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लावला आहे. पालकमंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या स्वयंस्फूर्त जनता संचारबंदीला अकोलेकरांनी गत दोन दिवसांत ठेंगा दाखवला. त्यामुळे प्रसिद्धी पत्रकाद्वारे पालकमंत्र्यांनी थेट जनतेलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे.
अकोल्यात करोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. त्यावर अद्यापही नियंत्रण आले नाही. पालकमंत्री म्हणून बच्चू कडू देखील अपयशी ठरले आहेत. दरम्यान, पालकमंत्री बच्चू कडूंनी लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कुठलीही तांत्रिक माहिती न घेता थेट १ ते ६ जून दरम्यान जनता संचारबंदीची घोषणा केली होती. त्याला मुख्य सचिवांनी परवानगी न दिल्याने स्वयंस्फूर्तीने जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी केले. त्याला अकोलेकरांनी कुठलीही दाद दिली नाही. परिणामी, निराश झालेल्या पालकमंत्र्यांनी ४ ते ६ जून दरम्यानची जनता संचारबंदी रद्द केली.
करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठबळाची गरज असून, त्याशिवाय करोनाला रोखणे अशक्य आहे. परंतू, जनतेमध्ये गांभीर्य नसल्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव जिल्हाभर वाढत आहे, असा थेट आरोप बच्चू कडू यांनी जनतेवर केला. करोनाला रोखण्यासाठी अकोलेकर निरुत्साही आहेत, केवळ शासकीय प्रयत्नाने करोना सारख्या आजाराला रोखणे शक्य नाही. नागरिकांच्या असहकार्यामुळे करोना सारखा विषाणू कदाचित येत्या काळात अधिक प्रभावीपणे आपले हातपाय पसरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाळा जवळ आल्याने इतर साथीचे आजार सुद्धा जोर पकडू शकतात. त्यामुळेच जनता संचारबंदीसाठी आग्रही होतो, मात्र अकोलेकरांनी त्याला प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. याचे अतिशय दु:ख होत असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. करोना सारख्या महामारीवर कुठलाही उपचार अथवा लस निघत नाही, तोपर्यंत नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.