शिर्डी येथील साईबाबा मंदिराला बॉम्बस्फोटाद्वारे दि. ९ नोव्हेबर रोजी उडवून देण्यात येईल, असे धमकीपत्र साईबाबा संस्थानला मिळाल्याने शिर्डीत सर्वत्र सध्या अफवांचे पीक पसरत आहे. दि. ९ नोव्हेंबरला शिर्डी बंद राहणार असल्याची अफवा सध्या सगळीकडे वा-यासारखी पसरली असून, त्यावर ग्रामस्थ व भक्तांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले आहे.
स्थानला धमकीचे निनावी पत्र हाताने लिहून पाठवण्यात आले होते. एका भुसा विक्रेत्याचे नाव छापलेल्या पाकिटाचा त्यासाठी वापर करण्यात आला. त्यात म्हटले आहे, की दि. २५ सप्टेंबर रोजी जांबोरी मैदान येथे मोदी आणि चौहान यांना उडवायचे होते. मात्र येत्या दि. ९ नोव्हेंबरला ९ वाजून ११ मिनिटांनी साईबाबा मंदिर व त्यानंतर ११ मिनिटांनी शिर्डी येथील शिवसेना कार्यालय उडवण्यात येणार आहे. आमचे पुढचे लक्ष्य मुंबईतील शिवसेना कार्यालय, मातोश्री व शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थान आहे. हे स्फोट रोखू शकत असाल तर रोखा असे आव्हानही या धमकीपत्रात देण्यात आले आहे. शिर्डी पोलिसांना अद्यापपर्यंत या पत्राचे कुठलेही धागेदोरे मिळालेले नाही.
या आधी अशाप्रकारची अनेक धमकीपत्रे संस्थानला मिळाली होती. मात्र हे सर्व पत्र आत्तापर्यंत खोटे ठरले आहेत. मात्र या धमकीपत्राच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून, शिर्डीमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मंदिर परिसराचे चारही मुख्य प्रवेशद्वारांवर भक्तांची धातुशोधक यंत्राद्वारे कडक तपासणी करून आत सोडण्यात येत आहे. भक्तांना मंदिर परिसरात मोबाइल, बॅग, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाण्यावर र्निबध घालण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिर्डीतील िपपळवाडी रस्ता, साई कॉम्प्लेक्स मंदिराची संवेदनशील असलेली दक्षिण बाजू अशा ठिकाणी बंद ठेवणार असल्याची अफवा शिर्डीत सुरू आहे. या अफवांचा परिणाम शिर्डीतील व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच्या सुटय़ांमध्ये या अफवेमुळे शिर्डीतील गर्दी कमी होण्याची चिंता व्यावसायिकांना वाटते.
संस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की शिर्डीत कुठल्याही प्रकारचा बंद नसून दि. ९ नोव्हेंबरला साई मंदिराचे दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणेच होणार आहेत. भक्त व ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वस ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. मंदिराचे सुरक्षाप्रमुख पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनीही मंदिर परिसरातील प्रवेशद्वारांवर सुरक्षाव्यवस्था कडक केली असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.