अलिबागमधील खांदेरी किल्ल्यावर क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबई आणि अलिबाग येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

अलिबाग जवळ समुद्रात असलेल्या खांदेरी किल्यावर मुंबई येथून ५० ते ६० जणांचा एक ग्रुप सहलीसाठी आला होता. त्याचवेळी आक्षी येथील ३० ते ४० जणही सहलीसाठी आले होते. खांदेरी किल्यात असलेल्या वेताळ देवाला मान देण्यासाठी आक्षीतील तरुणाई गेली होती. मान दिल्यानंतर आक्षीकर आणि मुंबईतील पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बसले होते. यावेळी आक्षी मधील एकाने मुंबईच्या पर्यटकांकडे फोन करण्यासाठी मोबाइलची मागणी केली. त्यावेळी मुंबईतील पर्यटकाने त्याला नंबर सांग फोन लावतो असे सांगितले. याचा राग आक्षीकर इसमाला आला आणि त्याने मुंबईच्या पर्यटकाचा मोबाईल पाण्यात फेकला. त्यावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली. मात्र काही वेळाने सर्व शांत झाले.

सायंकाळी मुंबईतील पर्यटक हे जाण्यास निघाले असता त्यातील एकाने ‘निघतो भावांनो’ असं बोलला. यावर आक्षीतील तरुणांनी अपशब्द वापरल्याने दोन्ही गटात धुमश्चक्री झाली. दोन गटात झालेल्या या मारहाणीत दोन्हीकडचे जखमी झाले आहेत. अलिबाग पोलिसांना ही घटना कळताच तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत जखमी झालेल्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास सुरु आहे.

किल्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी घाला
अलिबाग जवळच्या समुद्रात एका बेटावर असलेल्या खांदेरी किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावतात. या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले जाते. मद्यधुंद अवस्थेत हे पर्यटक धिंगाणा घालतात. ऐतिहासिक वास्तुचे पावित्र राखणे गरजेचे आहे. त्यामुळे किल्ला परिसरात मद्यप्राशन करण्यास बंदी घालावी अशी मागणी आता शिवप्रेमींकडून केली जात आहे.