जालना : इतर समाजास आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणास धक्का लावू नये आणि ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी जालना येथे मोर्चा काढण्यात आला. समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाच्या वतीने सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारले. ओबीसी प्रवर्गातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपल्या न्याय्यहक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

भाजपचे खासदार विकास महात्मे, खासदार भागवत कराड, आमदार नारायण कुचे, आमदार अतुल सावे, राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड, काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटय़ाल आणि राजेश राठोड यांच्यासह प्रकाश शेंडगे, माजी मंत्री बावनकुळे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील अनेक नेतेमंडळी समारोपाच्या कार्यक्रमात श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. व्यासपीठावर फक्त मंत्री वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून एका विद्यार्थिनीच्या हस्ते ओबीसी प्रवर्गाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि उत्तरादाखल भाषण केले.

वडेट्टीवार म्हणाले, मंत्री म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून आपण आलो आहोत. हा मोर्चा कुणाच्या विरुद्ध नाही तर ओबीसी प्रवर्गाच्या न्याय्यहक्कांसाठी आहे. इतरांच्या हक्काचे काढून घेण्याची आमची मागणी नाही. ओबीसी प्रवर्गातील नेतेमंडळी जोपर्यंत पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करणार नाहीत तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत.