राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरसह वरळीच्या घरावर अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) आज (शुक्रवार) छापा टाकत झाडाझडती सुरू केली आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईवरून आता महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत, मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“लोकशाही वाचवण्यासाठी मविआ सरकारला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव तीनही पक्षांनी हाणून पाडला पाहिजे. विरोधकांचा छळ करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आरोपकर्ते आर्थिक देवाण-घेवाण झाली नाही असे म्हणत असतानाही अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करणाऱ्या इडीने उत्तर द्यावे.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

“यंत्रणेचा गैरवापर हे त्यांचं ‘स्टाईल ऑफ ऑपरेशन’ दिसत आहे”; सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा!

तसेच, “अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरती छापे मारले जात आहेत. आम्हाला हा प्रश्न पडला आहे, ईडी त्यांच्या घरात इतक्या दिवसानंतर काय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याचं कारण, असं की ज्यांनी पुराव्याशिवाय आरोप केले ते परमबीर सिंग असतील किंवा सचिन वाझे असतील, त्यांच्या आरोपात हे कुठेही म्हटलं नाही की पैसे दिले गेले. ईडाचा कायदा असं म्हणतो की, पैशांचा व्यवहार असण्याची आवश्यकता आहे. जर पैशांचा व्यवहार नव्हताच, तर काय शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. जर ईडीच्या मते तिथं पैशांचा व्यवहार झालेला आहे, असं म्हटलं. तर, ज्यांनी पैसे दिले त्यांच्याकडे ते कुठून आले, याची चौकशी का केली जात नाही. परमबीर सिंग यांची चौकशी का केली जात नाही, त्यांच्या घरावर रेड का पडत नाही. याचं कारण आहे की या तिन्ही तपास यंत्रणा ज्या आहेत, त्यांचा दुरुपयोग केला जातोय. त्यांनी आपली स्वायत्तता पूर्णपणे मोदी सरकारच्या पायावर वाहिलेली आहे आणि त्यांचा उपयोग राजकीय शस्त्र म्हणून, विरोधकांना छळण्यासाठी केला जातोय. हा महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचसाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांना छळण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय.” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’च्या छापेमारीवर गृहमंत्री वळसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

याचबरोबर, “एकीकडे कुठलेही पुरावे नसताना, परमबीर सिंगांना हा प्रश्न विचारला पाहिजे. की तुमच्याकडे माहिती आली तर तुम्ही का कारवाई केली नाही, त्यासाठी देखील ईडी, सीबीआय कुणी त्यांना बोलवत नाही. अत्यंत विरोधाभासीहे चित्र निश्चितपणे दिसत आहे. म्हणूनच तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन, महाविकासआघआडी सरकारला बदनाम करण्याचा हा जो डाव आहे, हा जो कट आहे मोदी सरकारचा तो हाणून पाडला पाहिजे आणि निश्चितपणे लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र होऊन याला लढा दिला पाहिजे, अशी आमची भावना आहे.” असं सचिन सावंत यांनी बोलून दाखवलं आहे.