जमिनी गेलेल्या धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र निळवंडेच्या नावाखाली राजकारण करून सदैव आम्हाला बदनाम करणा-यांनी निळवंडेचे पाणी परस्पर उचलण्याची भूमिका घेतली, तर हक्काच्या पाण्यासाठी लाभक्षेत्रातील लोकांनी सुरू केलेल्या जागृतीला आपणही पाठिंबा देऊ असा इशाराही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.
निळवंडे धरणामुळे ज्या आदिवासींच्या जमिनी गेल्या, त्यांच्या पुनर्वसनासाठी पालकमंत्री मधुकर पिचड व तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला आपण सदैव पाठिंबाच दिला, असेही विखे म्हणाले. राहात्यातील टंचाई आढावा बैठकीत विखे बोलत होते. तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेऊन विखे म्हणाले, निळवंडय़ाच्या बाबतीत नेहमीच राजकीय भूमिका घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कालव्यांसह धरण पूर्ण करण्याची भूमिका पहिल्यापासून आपण घेतली. मात्र वरच्या भागातच कालव्यांची कामे सुरू नाहीत. तरीही कालव्याच्या नावाखाली राजकारण करून आपली पोळी अनेकांनी भाजून घेतली.
निळवंडेत साठवले जाणारे पाणी उपसा सिंचनाद्वारे देण्याचा निर्णय परस्पर घेण्यात आला. कालव्यातून लाभक्षेत्राला पाणी मिळावे ही भूमिका असताना संगमनेरने मात्र पाइपलाइनने पाण्याचा लाभ मिळविण्याचे प्रयत्न सुरू करून जिरायत भागातील शेतक-यांची निळवंडय़ाच्या प्रश्नावर दिशाभूल केली आहे. निळवंडय़ाचे कार्यक्रम आणि निर्णयाच्या बैठकाही आता परस्पर होऊ लागल्या आहेत. मात्र उपसा सिंचनच्या नावाखाली इतर कोणी त्याचा लाभ घेत असेल तर लोकांनी सुरू केलेल्या चळवळीला पाठिंबा देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.