खासदार – विनायक राऊत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव करून शिवसेनेचे विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून सत्ताधारी आघाडीचे सदस्य म्हणून लोकसभेत पोहोचले ksतेव्हा कोकणच्या जनतेच्या आशा पुन्हा एकवार पल्लवित झाल्या. कारण या प्रदेशाच्या विकासाबाबत चर्चा भरपूर होत असली तरी प्रत्यक्ष कृती फारच अभावाने झाली आहे. अर्थात राऊतांना मिळालेला कौल मुख्यत्वे नकारात्मक, राणे पिता-पुत्रांच्या विरोधातून होता. पण या संधीचा लाभ उठवत गेल्या वर्षभरात कोकणच्या विकासाची दृष्टी ठेवून त्यांच्याकडून कोणतीही ठोस योजना मांडली गेलेली नाही किंवा पाठपुरावा झालेला नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण किंवा कोकण रेल्वेच्या सुविधांमध्ये दर्जात्मक सुधारणांचे श्रेय ते घेऊ बघतात, भूमिपूजनांचा धडाकाही लावतात, पण ते संबंधित खात्यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्षमतेमुळे घडत आहे, असे खापर फोडले जाते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाची भूमिका शिवसेनेने सुरुवातीपासून घेतली आहे. स्वाभाविकपणे खासदार राऊतही उग्र आंदोलनाची भाषा वेळोवेळी करत असतात. पण त्यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा महामंडळाच्या रत्नागिरीतील कार्यालयाला टाळे लावण्याच्या आंदोलनाचा बार फुसकाच ठरला. उलट पक्षांतर्गत श्रेयवादातून गटबाजी चव्हाटय़ावर आली.

कोकणाला मागे नेले  – नीलेश राणे (काँग्रेस)
अवघ्या एक वर्षांत कोकणला पाच वष्रे मागे नेण्याचे काम खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. ते सांगत असलेल्या योजनांमध्ये नवीन काहीही नाही. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना त्रास देणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्य़ांचं प्रतिनिधित्व ते करत असले तरी त्यांचे सर्व लक्ष केवळ कुडाळ आणि मालवणवरच असते. सभागृहातही ते अजिबात प्रभाव पाडू शकलेले नाहीत.
– सतीश कामत

‘राणेंच्या तुलनेत उजवी कामगिरी’
केंद्रात स्थापन झालेल्या सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षभराच्या काळात कोकणाशी संबंधित विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, गौण खनिजांपैकी जांभा दगडाच्या उत्खननावरील र्निबध शिथिल करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सोसावे लागलेल्या आंबा उत्पादकाला हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकास आराखडय़ासाठी मोठी तरतूद इत्यादींचा त्यामध्ये उल्लेख करता येईल. नीलेश राणेंच्या तुलनेत माझी पहिल्या वर्षांतील कामगिरी कितीतरी उजवी आहे.
– विनायक राऊत